गावागावातून अमृतकलश यात्रेला उत्तम प्रतिसाद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला आढावा

गावागावातून अमृतकलश यात्रेला उत्तम प्रतिसाद

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला आढावा

       भंडारा दि. 20 : ‘मेरी माटी मेरा देश’, या उपक्रमामध्ये एक सप्टेंबर ते एक नोव्हेंबर 2023 या कालावधीत अमृत कलश यात्रा आयोजित करण्यात येणार आहे. उपक्रमाचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी समीर करतो कोटी यांनी आज घेतला यावेळी या बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत उमेश नंदा गवळी, सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते. यासाठी गावागावांमध्ये तयारी करण्यात येत असून प्रत्येक गावात या संदर्भातील नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांनी दिल्या आहेत.

            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यावर्षी ‘मेरी माटी मेरा देश ‘, हा उपक्रम राबविण्यात येत असून केंद्र व राज्य शासनाच्या दिशा निर्देशानुसार अमृत कलश यात्रा आयोजित करण्याबाबतच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. या अमृत कलश यात्रेमध्ये नेहरू युवा केंद्राची युवक- युवती देखील सहभागी होणार आहेत. एक सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत गावागावात या संदर्भात अनेक उपक्रम साजरे होणार आहे. शेतकऱ्यांकडून शेतातील एक मूठ माती, तांदूळ जमा करून ती अमृतकलशामध्ये टाकण्यात येणार आहे. ग्रामपंचायतच्या हद्दीतून एक कलश तालुक्याच्या ठिकाणी दिला जाणार आहे. प्रत्येक गावात अमृत वाटिका तयार करण्याचे देखील निर्देशित करण्यात आले आहे. गावामध्ये माती व तांदूळ गोळा करताना पंचप्राण प्रतिज्ञा घेण्याची सूचना त्यांनी केली आहे.

            गाव पातळीवरील नियोजनानंतर एक ते 13 ऑक्टोबर या कालावधीत तालुकास्तरावरचे उपक्रम करण्याबाबतचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले असून मोठ्या संख्येने या उपक्रमात स्वातंत्र्य संग्राम सैनिक, ज्येष्ठ नागरिकांना सहभागी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तालुक्यातील कलश मुंबई मार्गे दिल्ली येथील कार्यक्रमासाठी जाणार आहेत. त्यामुळे गावागावात यासंदर्भात प्रसिद्धी करण्यात यावी, असे आवाहनही  त्यांनी यावेळी केले.