आगामी गोपालकाला व गणेशोत्सवात खबरदारी आवश्यक  – जिल्हाधिकारी संदीप कदम

आगामी गोपालकाला व गणेशोत्सवात खबरदारी आवश्यक  – जिल्हाधिकारी संदीप कदम

  • नागरिकांनी गर्दी टाळावी
  • नियमांचे पालन आवश्यक

भंडारा,दि.29: कोविड संसर्गाचा धोका लक्षात घेऊन आगामी दहीहंडी, गोपालकाला आणि गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी स्थानिक स्वरूपाचे निर्बंध लावण्यात यावेत अशी सूचना केंद्रीय आरोग्य सचिव व महाराष्ट्र शासनाने दिल्या आहेत. भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्हीटी दर कमी असला तरी ओनम नंतर केरळमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून आला. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यंत खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.

            राज्य शासनाने यापूर्वीच यासंदर्भात सूचना दिल्या होत्या, आणि आता केंद्रीय आरोग्य विभागाने देखील या उत्सवांमध्ये काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगून त्याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी कोरोना प्रोटोकॉलचे पालन करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

            कोविडचा धोका अजून गेलेला नसल्याने हे उत्सव सुपर स्प्रेडर्स ठरू शकतात अशी भीती आयसीएमआर आणि एनसीडीसीने यापूर्वी व्यक्त केली आहे. राज्यात विषाणूच्या नव्या प्रकाराचा संसर्ग वाढतोय असे लक्षात आले आहे, त्यामुळे ही काळजी घेणे गरजेचे आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याने संसर्ग रोखण्यात यश मिळविले आहे त्यामुळे टेस्ट-ट्रेक-ट्रीट वर भर देणे तसेच कोविड संदर्भातील सर्व आरोग्याचे नियम याचे पालन कटाक्षाने होईल हे पाहणे गरजेचे आहे. सद्या उत्सवाचे पर्व सुरू असून या काळात नियमांचे पालन न केल्यास धोका अधिक वाढू शकतो. केरळमध्ये ओनम उत्सवात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे निदर्शनास आले आहे. आपल्या जिल्ह्यात आगामी काळात गोपालकाला व गणेशोत्सव यासारखे सण उत्सव होऊ घातले आहेत. हे उत्सव अत्यंत साधेपणाने साजरे करावेत असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

            सर्वांनी आरोग्याच्या नियमांचे कसोशीने पालन करणे गरजेचे आहे तसेच राज्य शासन वेळोवेळी यासंदर्भात ज्या सूचना देईल ते जनतेच्या हिताचेच असल्याने राजकीय, सामाजिक, आणि सर्व स्तरातील लोकांनी कृपया सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. स्वत:बरोबर इतरांच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी असे ते म्हणाले.