‘आयुष्मान भव’ आरोग्य सुविधेच्या बळकटीसाठी केंद्र शासनाची महत्त्वकांक्षी मोहीम

आयुष्मान भव आरोग्य सुविधेच्या बळकटीसाठी केंद्र शासनाची महत्त्वकांक्षी मोही

Ø आभा कार्डसह मिळणार विविध आरोग्य सुविधांचा लाभ

चंद्रपूर, दि. 15 : केंद्र शासनाची अत्यंत महत्त्वकांक्षी आयुष्मान भव ही मोहीम राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दि. 13 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 पर्यंतच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत सर्व ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

यावेळी  मनपा आयुक्त विपीन पालीवाल, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बालरोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद कांबळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद किन्नाके उपस्थित होते. या मोहिमेंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.

आयुष्मान आपल्या दारी : आयुष्मान आपल्या दारी उपक्रमांतर्गत आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे आयुष्यमान कार्ड काढण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 9 लक्ष 93 हजार 232 लाभार्थी असून त्यापैकी 3 लक्ष 49 हजार 150 लाभार्थ्यांचे आयुष्यमान कार्ड करीता ई-केवायसी पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित 6 लक्ष 44 हजार 82 लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड आशा स्वयंसेविका व सिएससी सेतू केंद्रामार्फत मोफत काढण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना प्रतिवर्ष प्रतीकुटुंब रु. 5 लक्ष आरोग्य विमा पुरविण्यात येणार आहे.

आभा कार्ड  : आभा कार्डद्वारे आरोग्याशी निगडित माहिती, तपासण्या, औषधोपचार, डॉक्टरांच्या भेटी आदी डिजीटल रेकॉर्ड या आभा कार्डवर नोंदविता येणार आहे. तसेच आभा कार्ड हे अशा स्वयंसेविकामार्फत काढण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान 19 लक्ष 56 हजार 761 लाख कार्ड काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

स्वच्छता अभियान : दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोर 2023 हा स्वच्छता पंधरवाडा म्हणून राबविण्यात येणार आहे. यादरम्यान सर्व आरोग्य संस्था, शाळा व महाविद्यालयात स्वच्छता अभियान राबविण्यात येईल.

आयुष्मान सभा : दि. 2 ऑक्टोबर 2023 रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात येणार असून गावपातळीवर एकुण 1407 ग्राम आरोग्य, स्वच्छता व पोषण समिती, उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. या सभेत आयुष्मान कार्ड, आभा कार्ड व इतर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची माहिती देण्यात येणार असून मोहिमेची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे.

आयुष्मान मेळावा आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्रात महिन्याच्या दर आठवड्यातील शनिवारी उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये, पहिल्या आठवड्यात असंसर्गजन्य रोग (मधुमेह, उच्च रक्तदाब, मुख, स्तन व गर्भाशय मुख्य कर्करोग) दुसऱ्या आठवड्यात क्षयरोग, कुष्ठरोग आणि इतर संसर्गजन्य आजार, तिसऱ्या आठवड्यात माता-बाल आरोग्य, पोषण व लसीकरण आरोग्य सुविधा तर चौथ्या आठवड्यात कान, नाक व घसा, नेत्ररोग चिकित्सा व सिकलसेल तपासणी करण्यात येणार आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या सहकार्याने उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये एकूण 19 शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्याला आरोग्य मेळावा घेण्यात येणार असून असे एकूण 4 आरोग्य मिळावे घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात प्रामुख्याने स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग, कान, नाक व घसा, त्वचारोग, मानसिक आजार, दंत शल्य चिकित्सक, टेली कन्सल्टेशन सेवा आदी तज्ञ यांच्यामार्फत आरोग्य सुविधा देण्यात येणार आहे.

 

रक्तदान मोहीम : या मोहिमेदरम्यान जिल्ह्यात एकूण 10 रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येईल. राजुरा येथे 17 ऑक्टोबर 2023 रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.

अवयवदान : सर्व आरोग्य संस्थांमध्ये, ग्रामसभेमध्ये, शाळा, कॉलेज, कार्यालय येथे अवयवदान बाबत प्रतिज्ञा देण्यात येईल. सर्वांना अवयवदान करण्यासाठी आवाहन करण्यात येऊन अवयवदानाची इच्छा आहे अशा व्यक्तींना वेबलिंक व नोंदणी करण्यास सांगण्यात येईल. अधिक माहितीकरीता टोल-फ्री क्र. 1800-1147-70 असून https://notto.abdm.gov.in/pledge-registry हि वेब लिंक आहे.

अंगणवाडी मधील 0 ते 6 वर्ष वयोगटातील एकूण 1 लक्ष 30 हजार 734 मुलांची आरोग्य तपासणी तर शाळांमधील 6 ते 18 वर्षे वयोगटातील 1 लक्ष 57 हजार 405 मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान 18 वर्षावरील सर्व 7 लक्ष 76 हजार 199 पुरुषांची आरोग्य तपासणी देखील करण्यात येणार आहे. व निदान करून त्यावर उपचार व आवश्यकतेनुसार संदर्भसेवा सुद्धा देण्यात येणार आहे. नागरिकांचे भविष्य सुरक्षित राहील यासाठी उपचार व आरोग्य तपासणी दिली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आयोजित पत्रकार परीषदेत  सांगितले.