चिखलाबोडी येथे करडई पीकाचा यशस्वी प्रयोगक रडई पीक उत्पादन घेण्यासाठी कृषी विभागाचे प्रोत्साहन

चिखलाबोडी येथे करडई पीकाचा यशस्वी प्रयोग रडई पीक उत्पादन घेण्यासाठी कृषी विभागाचे प्रोत्साहन

       भंडारा,दि.13: धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणा-या या जिल्हयात आता तेलासाठी ओळखल्या जाणा-या करडईचे उत्पादन ही चांगले होऊ शकते.सातत्याने धानाचे उत्पादन घेतल्याने पिक वैविध्य होत नाही ,परिणामी जमीनीचा पोतही सुधारत नाही.कृषी विभागाने करडई पीक उत्पादन घेण्यासाठी शेतक-यांना प्रोत्साहीत केले आहे.व याचे पीक प्रात्यक्षिक  लाखनी तालुक्यातील चिखलाबोडी गावात करण्यात आला आहे.

        चिखलाबोडी हे गाव २७१ लोकसंख्या,७० कुटुंब व भौगोलिक क्षेत्र २६५.६४ हेक्टर असलेले छोटेसे गाव लाखनी तालुक्यापासून ८ किलोमीटर अंतरावर आहे,चिखलाबोडी गावांमध्ये खरीप हंगामात धान,तुर पिके व रब्बी हंगामामध्ये लाखोरी व काही क्षेत्रावर हरभरा,गहू ह्या प्रमुख पीक पद्धती होत्या,गावा लगतचे क्षेत्र वन परिसराने व्यापलेले असून जास्तीत जास्त शेती ही कोरडवाहू आहे,खरीप हंगामात धनाची शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून रब्बी हंगामामध्ये अपुरे सिंचन व जंगली प्राण्यांच्या त्रासामुळे इतर पिके घेण्यास मर्यादा होत्या.

      सन २०२१-२२ या वर्षांमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – भात पड क्षेत्रावर लागवड (TRFA) अंतर्गत करडई लागवड प्रकल्पासाठी चिखलाबोडी या गावाची भौगोलिक परीस्थ्तीतीचा विचार करून निवड करण्यात आली.

        कृषी विभागामार्फत करडई पिकाबाबत जनजागृती करून २५ शेतकऱ्यांची दहा हेक्टर क्षेत्रावर करडई पिकाची लागवड करण्यासाठी निवड करण्यात आली व प्रकल्पाच्या माध्यमातून प्रति शेतकरी एकरी चार किलो बियाणे (PBNS-८६ वाण) पुरवठा करून प्रात्यक्षिक राबविण्यात आले व कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली लागवड करण्यात आली.

     लहान अवस्थेतील करडई भाजीसाठी वापरली जाते. करडईच्या पानांमध्ये ‘अ’ जीवनसत्व, लोह,स्फुरद आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. हिरवा पाला जनावरांना चाऱ्यासाठी वापरला जातो. हिरव्या झाडापासून मूरघास तयार करता येतो.

      करडई पाकळ्यांचे गुणधर्मही मोठया प्रमाणावर आहेत. सुकलेल्या पाकळ्यांवर आधारित औषधामुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्तपुरवठा, तसेच प्राणवायू मिसळण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे रक्तवाहिन्यांत गुठळ्या होण्याचे प्रमाण कमी होते.

       हानीकारक कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, मासिक पाळीतील अनियमितता, सांधेदुखी, वंध्यत्व, पोटाचे विकार, शरीरातील खाज आदी विकार कमी होतात. चीनमध्ये पाकळ्याचा उपयोग प्रामुख्याने औषधनिर्मिती, रंगनिर्मिती व सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी केला जातो. पाकळ्यांपासून उत्तम प्रकारचा चहा तयार होतो. याशिवाय करडई पेंड ही  जनावरांना पौष्टिक खाद्य म्हणून उपयोगी आहे. करडई बियांची टरफले सेल्युलेज व इन्सुलेशन तयार करण्यासाठी उपयोगात आणतात.

        करडईच्या खोडाचा उपयोग पार्टिकल बोर्ड पेपरनिर्मितीसाठी लगदा तयार करण्यासाठी वापरतात. एकत्रित काढणी व मळणी यंत्राद्वारे काढणी केली असता झाडाच्या फांद्या, खोडाचे तुकडे, पाने आदी शेतात विखुरली जातात. कुजल्यानंतर त्यांचा सेंद्रिय खत म्हणून उपयोग होतो.बिया बियांचा वापर परदेशांत प्रामुख्याने पाळीव, तसेच जंगली पक्ष्यांच्या खाद्यासाठी करतात.

     भारतात बियांचा उपयोग प्रामुख्याने तेलासाठी करतात. बियांमध्ये २८-३५ टक्के तेल असते. करडईच्या तेलात लिनोलीक या असंपृक्त घटकाचे प्रमाण ७८ टक्के असते. करडईच्या तेलाच्या वापराने शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण योग्य राखण्यास मदत होते. रक्तदाब, हृदयविकार असणाऱ्यांसाठी हे तेल उपयुक्त आहे. याशिवाय करडई तेलाचा उपयोग रंग, तसेच रेक्‍झीन तयार करणे, जलरोधक कपड्यांच्या उद्योगात कातडी कमावण्यासाठी, लहान मुलांचे अन्न तयार करण्यासाठी केला जातो.

          करडई हे कोरडवाहू पीक असल्यामुळे कमी ओलाव्यामध्ये पिकांची चांगली वाढ झाली.करडई पिकावर किड व रोगांचा प्रादुर्भाव खूप कमी असतो, डिसेंबर – जानेवारी महिन्यामध्ये मावा किडीचा काही प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आला त्यावर उपाययोजना म्हणून कीटकनाशकांच्या प्रकल्पाच्या माध्यमातून DBT पुरवठा करण्यात आला.

        करडई हे पिक शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्णपूर्ण होते व काही शेतकऱ्यांना पिकाची ओळख होती जुने शेतकरी करडई पिकाला ‘‘कुडु’ या नावाने ओळखतात करडई पिक काटेरी असून कापणीस व मळणी करण्यास त्रासदायक आहे अशी शेतकऱ्यांची धारणा होती,कापणीची व मळणीची अडचण पाहता हार्वेस्टर ने कापणी-मळणी कशी करता येईल याबाबत शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात आले व कृषी विभागामार्फत कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत लाभ मिळालेल्या हार्वेस्टरलाभार्थी शेतकऱ्यांमार्फत हार्वेस्टरने कापणी व मळणी

करण्यात आली या मुळे कापणी करण्याची अडचण दूर होऊन आर्थिक बचत झाली.

       करडई पिकाचे लागवडीपासून तर कापणी व मळणी पर्यंत आर्थिक ताळमेळ पाहता हे पीक फायदेशीर आहे मळणी झाल्यानंतर सरासरी उत्पादन ६.०० क्विंटल प्रति हेक्टरी मिळाले व सरासरी दर प्रति किलो ६० रुपये मिळाला. काही शेतकऱ्यांनी बियांपासून तेल काढून त्याच्या खाद्यतेल म्हणून उपयोग केला आहे.करडई हे पिक कोरडवाहू शेतीसाठी वरदान असून मशागतीय खर्च कमी आहे व मिळणारे उत्पन्न हे ६० ते ६५ टक्के नफा मिळवून देणारे आहे,

       चिखलाबोडी गावास करडई या पिकाची ओळख झालेली असून भविष्यामध्ये करडई पिकाखालील क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे व कृषी विभागाच्या मार्गदर्शनात सरासरी उत्पादनामध्ये निश्चितच वाढ होणार आहे. चिखलाबोडीचे उदाहरण पाहता शेतक-यांनी करडई पीक घेण्यास पुढाकार घेण्याचे आवाहन, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.