विविध योजनांचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा-माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे प्रतिपादन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर जनसंपर्क विभाग

विविध योजनांचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा-माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे प्रतिपादन

 

        भंडारा, दि. (१२ : विद्यापीठाकडून राबविल्या जात असलेल्या विविध योजनांचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी केले. विद्यापीठाशी संलंग्नित भंडारा जिल्ह्यातील महाविद्यालयांचे संस्था संचालक, प्राचार्यांची सभा भंडारा येथील जे. एम. पटेल महाविद्यालयात सोमवार, दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी पार पडली. प्राचार्यांच्या सभेत माननीय कुलगुरू डॉ. चौधरी मार्गदर्शन करीत होते.

         सभेचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी भूषविले. यावेळी अधिसभा सदस्य श्री. मनीष वंजारी, विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग सदस्य डॉ. कल्पना पांडे, विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. मंगेश पाठक, जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

         यावेळी बैठकीमध्ये माननीय कुलगुरू डॉ. चौधरी यांनी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाकडून राबविल्या जात असलेल्या विविध योजनांबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात यावी. महाविद्यालयाकडून विद्यार्थी केंद्रित शिक्षण मिळावे असे कार्यक्रम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.

         सोबतच शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त राबविल्या जात असलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. विद्यापीठ परिक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यात संस्था संचालक व प्राचार्यांची बैठक आयोजित केली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. विद्यापीठ विद्यार्थी विकास संचालक डॉ. मंगेश पाठक यांनी प्रास्ताविक करताना विद्यार्थी विकास विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती बैठकीत दिली.

       या योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन महाविद्यालयांना करण्यात आले. स्वागतपर भाषण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. कार्तिक पनीकर यांनी केले तर आभार डॉ. संगीता घडगे यांनी मानले. बैठकीला भंडारा जिल्ह्यातील विद्यापीठाची संलग्नित 25 महाविद्यालयांचे संस्था संचालक व प्राचार्य असे 50 जण उपस्थित होते.