जिल्हा परिषदेतर्फे 17 शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

जिल्हा परिषदेतर्फे 17 शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

चंद्रपूर, दि. 05 : शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेतर्फे 15 प्राथमिक तर दिव्यांग/संगीत/ कला विभाग आणि माध्यमिक विभागातील प्रत्येकी एक अशा एकूण 17 शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्काराचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मा.सा. कन्नमवार सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

याप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार,आमदार सुधाकर अडबाले, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. गायकवाड, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथ.) राजकुमार हिवारे, उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) श्रीमती ठाकरे, कार्यकारी अभियंता प्रियंका रायपुरे यांच्यासह आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक-शिक्षिका, गुणवंत विद्यार्थी, सर्व गटशिक्षणाधिकारी तसेच विविध अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना शिक्षणाची रुची लावण्याचे काम शिक्षक करीत असतात. समाज घडविण्यामध्ये शिक्षकांचा मोठा सहभाग असून समाजात शिक्षकांप्रती आदर असतो. तसेच विश्वसनीय व्यक्तिमत्व म्हणून शिक्षकाकडे पाहिले जाते. शिक्षकांची जबाबदारी मोठी असून समाजनिर्मिती करणारे हे शिक्षकच आहे, असे ईश्वररुपी कार्य शिक्षकांचे असल्याचे ते म्हणाले.

आमदार सुधाकर अडबाले म्हणाले, शिक्षक समाजात, विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या नजरेत आदर्श असतात. जिल्ह्यातील आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी पुनश्च: उत्तमप्रकारे कार्य करून जिल्हा पुरस्कारासह राज्य व राष्ट्रीय पुरस्कार मिळवावेत. पुरस्कार मिळाल्यामुळे शिक्षकांची जबाबदारी देखील वाढली असल्याचे ते म्हणाले.

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, देशाच्या व समाजाच्या विकासात शिक्षकाचे मोठे योगदान आहे. देशाची भावी पिढी घडविण्याचे मोठे कार्य शिक्षकांच्या हातून होत असून शिक्षक भावी पिढी घडविणारा शिल्पकार आहे. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कला व गुण शोधू शकतो. सामाजिक व आर्थिक परिस्थिती शिक्षक ज्ञानातून बदलवू शकतो. आदर्श शिक्षकांनी त्यांची शाळा त्यांच्याप्रमाणेच आदर्श करावी व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधावा, असे ते म्हणाले.

प्रास्ताविकातून शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे म्हणाले, शिक्षक विविध अध्यापन पद्धतीचा वापर करीत विविध नवोपक्रम शाळेत राबवितात. कृतीयुक्त शिक्षण, लोकसहभाग वाढविणे, नवतंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षणात नाविन्यपूर्णता आणण्याचे काम करतात. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जॉन्सन यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी रोड मॅप तयार करण्यात आला आहे. भरारी 2.0 या उपक्रमातंर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी, त्याबाबत वातावरण निर्मिती व स्पर्धा परीक्षेत टक्केवारी वाढावी यासाठी भरारी 2.0 उपक्रम राबविल्या जात आहे. तसेच शाळांमध्ये “लेट्स स्पीक” हा 3 महिने कालावधीचा वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून मराठी शाळेतील विद्यार्थी देखील कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांसारखेच इंग्रजी बोलू शकतील. शिष्यवृत्ती परीक्षेत बसण्याकरीता 7 हजार 500 विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी 200 याप्रमाणे जिल्हा निधीतून निधी मंजूर करण्यात आला असल्याचेही ते म्हणाले.

जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त शिक्षक : प्राथमिक विभागाचे पांडुरंग मेहेरकुरे(सोनेगाव(बेगडे)ता. चिमूर), माधव हाके (कोकेवाडा(मान) ता. भद्रावती), भास्कर डांगे (बाखर्डी ता.कोरपना), एकता बंडावार (केमारा ता. पोभूंर्णा), हिरालाल बनसोड (जवराबोडी (मेंढा) ता. ब्रह्मपुरी), सुनील हटवार (पारडी ठवरे ता. नागभीड), प्रशांत काटकर (बोर्डा, चंद्रपूर,) नरेश बोरीकर (गिलबिली ता.बल्लारपूर), वसंत राखुंडे (महालगाव ता.वरोरा), विठ्ठल गोंडे (कुडेसावली ता. गोंडपिपरी), बंडू राठोड (आंबेझरी ता. जिवती), प्रशांत बांबोळे (सुशी, ता. मुल), राजेश पवार (मानोली खुर्द, ता. राजुरा), अविनाश घोनमोडे (लोंढोली, ता. सावली), विनोद शास्त्रकार (खातगाव, ता.सिंदेवाही) दिव्यांग संगीत/कला/शिक्षक पुरस्कार संतोष मेश्राम (खराळपेठ ता. गोंडपिपरी), माध्यमिक विभाग शिक्षक शैलेश बरडे(विसापूर ता. बल्लारपूर) मान्यवरांच्या हस्ते जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त 17 शिक्षकांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन कुटुंबासह सत्कार करण्यात आला.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार : जिल्हा परिषद हायस्कूलमधून इयत्ता 10वी मध्ये 80 टक्के च्यावर गुण प्राप्त करणारे रिया पेद्दीवार (94.80), दिपाली रेबावार (94.20), गायत्री पांडे (93), स्वाती तोहोगांवकर (92.40), चांदणी खोबरे (92.20), मानसी मुद्रिकवार (89.40) तर इयत्ता 12 वी मध्ये संस्कृती  चहांदे (76.83), श्रुती वैद्य (76.50),ओम चावरे (72.67)या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलनाने, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. यावेळी जि.प. ज्युबली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे संचालन सपना पिंपळकर यांनी तर आभार उपशिक्षणाधिकारी श्रीमती ठाकरे यांनी मानले.