स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न

                भंडारा,दि.11: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त 8 ऑक्टोबर 2021 रोजी मानव मंदीर परसोडी येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुहास भोसले व प्रमुख पाहूणे म्हणून अधिवक्ता किशोर लांजेवार व जवाहरनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज बैसाने उपस्थित होते.

            अधिवक्ता किशोर लांजेवार यांनी महिलांचे अधिकार या विषयावर थोडक्यात मार्गदर्शन केले. जवाहरनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज बैसाने यांनी न्यायालयीन प्रक्रिया तसेच मुलभूत अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले.

            जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुहास भोसले यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे पुरविल्या जाणाऱ्या सेवांची माहिती दिली. महिलांचे अधिकार, स्त्रीया, मुले, औद्योगिक कामगार, दिव्यांग व्यक्ती, अटकेतील व्यक्ती, अनुसूचित जाती व जमातीतील सदस्य, नैसर्गिक आपत्तीचे, हिंसाचाराचे बळी तसेच इतर शोषित घटक व ज्यांचे वार्षिक उत्पन्न रुपये तीन लाखापेक्षा जास्त नाही अशा सर्वांना मोफत विधी सहाय्य मिळू शकते या बद्दल मार्गदर्शन केले. तसेच मनोधैर्य योजना, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 मधिल तरतुदी व जन्म मृत्यू नोंदणी मुदतीत झाली नसल्यास न्यायालयात अर्ज दाखल करण्याचे आवाहन त्यांनी केले. यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणची मदत घेता येईल असेही त्यांनी सांगितले.

            2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर आझादी का अमृत महोत्सव यात्रेदरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांचा व उपक्रमांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार रघुपती फंदे यांनी मानले.