मत्स्य निर्यातीसाठी जिल्ह्यात वाव मस्य उत्पादक शेतकरी व महिलांना देणार प्रशिक्षण एमपेडाच्या चमुची शिवणी बांधला भेट

मत्स्य निर्यातीसाठी जिल्ह्यात वाव मस्य उत्पादक शेतकरी व

महिलांना देणार प्रशिक्षण एमपेडाच्या चमुची शिवणी बांधला भेट

            भंडारा, दि. 24 :जिल्ह्यातील मस्योत्पादनाचे क्षेत्र लक्षात घेता व त्या क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी लक्षात घेता, त्या क्षेत्राची उत्पादकता वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून कोची येथील मरीन प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ( एमपेडा) या संस्थेच्या प्रतिनिधींनी जिल्ह्यातील शिवनीबांध या मत्स्यबीज केंद्राला भेट दिली.

          तसेच मत्स्य उत्पादक शेतकरी व मत्स्य उत्पादक सहकारी संघटनेच्या प्रतिनिधींशी ही चर्चा केली. या प्रतिनिधींनी गोसीखुर्द जलाशयाला भेट देऊन तेथे पिंजरा पद्धतीने मासेमारी करण्याबाबतची पाहणी केली. यामध्ये प्रामुख्याने एमपेडा कोचीचे सहसंचालक डॉ. एस कंदन, एमपेडा मुंबई चे उपसंचालक डॉ. गिबिन कुमार, एमपेडा गुजरातचे उपसंचालक श्री. रझाक अली, मुंबई एमपेडाचे पर्यवेक्षक अतुल साठे यांचा समावेश होता. या तज्ञ मंडळींनी मत्स्य उत्पादक सहकारी संघटनांच्या प्रतिनिधींशी पवनी येथे चर्चा केली तसेच साकोली तालुक्यातील शिवनीबांध येथे मत्स्य सखी म्हणून कार्यरत असलेल्या महिलांशी सुद्धा त्यांनी चर्चा केली.

         दर्जेदार व निर्यात क्षम उत्पादनासाठी या तज्ञ मंडळींनी मत्स्य उत्पादन क्षेत्रातील सर्व बाबीचा आढावा घेतला. प्रत्यक्ष भेट व चर्चेनंतर शिवनीबांध मत्स्यबीज केंद्रात गिफ्ट तीलापिया या विशिष्ट जातीच्या माशांची मत्स्यबीजाद्वारे पैदास करण्यात येणार आहे. यासाठी ऑक्टोबर महिन्यात मत्स्य सखी, मस्य उत्पादक शेतकरी आणि मत्स्य उत्पादक सहकारी संस्थेचे सदस्यांना उत्कृष्ट व निर्यातक्षम मासे निर्मितीचे प्रशिक्षण देऊन त्यांची क्षमता बांधणी करण्यात येणार आहे. या निर्यातक्षम माशांच्या प्रजातीमध्ये गिफ्ट तिलापिया, एशियन सिबास, आणि जम्बो प्रॉन या विशिष्ट प्रजातीच्या उत्पादनासाठी मार्गदर्शन आणि सहाय्य करण्यात येईल.

          अनुसूचित जाती व जमातीतील मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांना पाच दिवसाचे प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे. तसेच खवय्यांसाठी माशांपासून निर्माण करण्यात येणारे फिश वडा, जवळा चटणी, फिश कुरकुरे ,फिश कटलेट ,फिश वेफर्स आणि माशांची चटणी आणि लोणचे यासारख्या विविध मत्स्य पाककृतींचे प्रशिक्षण मत्स्य सखींना देण्यात येणार आहे. थोडक्यात महिलांचे देखील आर्थिक सक्षमीकरण या माध्यमातून करण्यात येणार आहे. निवडक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची नियुक्ती मास्टर ट्रेनर म्हणून करण्यात येईल. आणि त्या मास्टरट्रेनर यांच्याद्वारे जिल्ह्यातील मासेमारांना देखील प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

         विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर हे सातत्याने मत्स्य उत्पादनाच्या क्षेत्रातील वाढत्या रोजगार संधीबाबत पाठपुरावा करून त्यांना प्रशासकीय पातळीवर गती देत आहेत.