झाडांचे संगोपन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षिसे

एक मुल – एक झाड उपक्रमाद्वारे मनपाचे वसुधा वंदन
झाडांचे संगोपन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षिसे

चंद्रपूर ८ ऑगस्ट – आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने एक मुल – एक झाड उपक्रम चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे राबविल्या जात असुन या उपक्रमाद्वारे   वसुधेस वंदन केल्या जाणार आहे.
मेरी मिट्टी मेरा देश व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शहरातील पर्यावरण रक्षण तसेच सौंदर्यीकरण व सुशोभीकरण करण्याच्या दृष्टीकोनातुन ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान मनपाद्वारे हा उपक्रम राबविला जाणार असुन शहरातील सर्व शाळांमध्ये तसेच विविध रस्त्यालगत वृक्षारोपण केले जाणार आहे.सर्व शालेय मुलांना मनपातर्फे प्रत्येकी एक रोपटे दिले जाणार असुन या रोपट्याचे मुलांच्या हाताने वृक्षारोपण व संगोपन केले जाणार आहे.
या उपक्रमात सर्व मुला – मुलींना देण्यात येणारे रोपटे हे त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या जागेत अथवा जागा उपलब्ध नसल्यास रस्त्यालगत लावणे आवश्यक राहणार आहे. स्वतःच्या हाताने रोपटे लावल्याने मुलांना त्या झाडाबद्दल एक आत्मीयता वाटते, मुलांच्या वाढीबरोबर हे रोपटे वाढत असल्याने ते झाड जगेल या दृष्टीने विद्यार्थी प्रयत्न करतात.
शाळास्तरावर हा उपक्रम राबविण्यासाठी सर्व शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक यांची बैठक आयुक्त विपीन पालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली मनपा सभागृहात ३ ऑगस्ट रोजी घेण्यात आली होती. सर्व शाळांनी या पर्यावरण पुरक उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना वृक्षारोपण करण्यास प्रवृत्त करावे तसेच वृक्षांच्या संगोपनात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन करण्यात आले होते तसेच झाडांचे संगोपन करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या रिपोर्ट कार्ड सोबत मनपा मार्फत देण्यात येणारे प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येणार आहे.
सदर उपक्रमात भाग घेणाऱ्या व झाडांचे  संगोपन करून झाड जागविणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता प्रत्येक शाळेने शाळा स्तरावर लकी ड्रॉ काढला जाणार आहे. विजेत्या ३ विद्यार्थ्यांना मनपाच्या माध्यमातुन स्कुल बॅग,टिफिन बॉक्स, वॉटर बॉटल या स्वरूपाची बक्षिसे दिली जाणार आहेत. झाडांचे संगोपन करणाऱ्या विजेत्या विद्यार्थ्यांची यादी सर्व शाळा मनपाला देणार असुन त्यानंतर या विद्यार्थ्यांमधून मनपा स्तरावर लकी ड्रॉद्वारे विजेते निवडले जातील व त्यांना सायकल,स्मार्ट वॉच,ट्रॉली बॅग अश्या स्वरूपाची बक्षिसे दिली जाणार आहेत.