धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना

धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना

Ø 12 वी मध्ये 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण असलेले विद्यार्थी पात्र

Ø अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2023 पर्यंत

चंद्रपूर, दि. 4 : भटक्या जमाती – क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी निवासी व शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहू नये, तसेच जे विद्यार्थी वसतीगृहातील प्रवेशापासून वंचित आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना 6 सप्टेंबर 2019 पासून सुरू करण्यात आली आहे. 12 वी नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत भोजन, निवास, व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरीत करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे.

मुलभुत पात्रता : विद्यार्थी धनगर समाजातील असावा. विद्यार्थ्यांने अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे. तसेच केंद्र शासनामार्फत ज्या ज्या वेळी मेट्रिकोत्तर शिष्यवृतीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल, त्यानुसार या योजनेसाठी पालकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील. विद्यार्थ्याने स्वत:चा आधार क्रमांक आपल्या राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा.

शैक्षणिक निकष : सदर विद्यार्थी 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. इयत्ता 12 वी मध्ये किमान 60 टक्के गुण मिळालेले विद्यार्थी या योजनेस पात्र राहतील. योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्याची महाविद्यालयीन उपस्थिती 60 टक्के असणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्याची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल. निवड करण्यात आलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील. मात्र विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी त्या त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.

इतर निकष : एखाद्या विद्यार्थ्यास जास्तीत जास्त पाच वर्षे या योजनेचा लाभ घेता येईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे कमाल वय 28 वर्षांपेक्षा अधिक नसावे. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा. धनगर समाजातील अपंग विद्यार्थ्यास सदर योजनेचा लाभ प्राथम्याने देय राहील. विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांनी सदर योजनेचा लाभ घेतांना शासनाची फसवणूक केल्याचे आढळल्यास संबंधित विद्यार्थी व शैक्षणिक संस्था कायदेशीर कारवाईस पात्र राहतील.

प्रवेश : केवळ (जिल्ह्याचे ठिकाण) चंद्रपूर शहरातील महाविद्यालय/ संस्था येथे प्रवेशित असणे अनिवार्य

अर्ज स्वीकृती : सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, चंद्रपूर या ठिकाणी विद्यार्थ्यांना अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. आवश्यक कागदपत्रांची सुची अर्जासोबतच जोडण्यात आली आहे, असे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी कळविले आहे.