गांधी जयंतीपासून जिल्ह्यात ‘समस्या मुक्त गाव’ अभियान

गांधी जयंतीपासून जिल्ह्यात ‘समस्या मुक्त गाव’ अभियान

पालकमंत्र्यांच्या हस्ते पालेबारसा येथे शुभारंभ

चंद्रपूर, दि. 28 :  ‘खेड्याकडे चला’ असा संदेश राष्ट्रपिता महात्मा गांधींनी दिला होता. त्याचे औचित्य साधून पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून ‘समस्या मुक्त अभियान’ राबविण्यात येणार आहे. गावातील समस्या गावातच सोडविण्यासाठी संपूर्ण प्रशासन 2 ऑक्टोबर रोजी सावली तालुक्यातील पालेबारसा उपस्थित राहणार असून या अभियानाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
या अभियानामध्ये पालेबारसा गावासोबतच परिसरातील मंगरमेंढा,सायखेडा,उसरपार चक, उसरपार तुकुम, जानकापूर, बारसागड, मेहा खुर्द, सावंगी दीक्षित, असोला चक, भानापूर या गावातील नागरिकांच्या समस्या सोडविल्या जाणार आहेत. हा कार्यक्रम पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत होणार असून कार्यक्रमास जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, पोलिस अधीक्षक अरविंद साळवे तसेच इतर जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
त्यासोबतच उपविभाग व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित राहणार असून वरील नमूद गावातील नागरिकांनी लेखी स्वरूपात आपल्या समस्या या अभियानाच्या माध्यमातून मांडणे आवश्यक आहे. या अभियानामध्ये गावातील काही पात्र लाभार्थ्यांना सेवा/लाभाचे वाटप पालकमंत्री यांच्या उपस्थितीत होणार आहे. पालेबारसा व परिसरातील नागरिकांनी    दि. 2 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता इंदिरा गांधी विद्यालय, पालेबारसा येथे उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे.