७ ऑगस्टपासून तीन टप्प्यात मिशन इंद्रधनुष्य ५.० कार्यक्रम

७ ऑगस्टपासून तीन टप्प्यात मिशन इंद्रधनुष्य ५.० कार्यक्रम

चंद्रपूर २ ऑगस्ट – बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन असून, अर्धवट लसीकरण झालेले, तसेच लसीकरण न झालेली बालके ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात त्यामुळे केंद्र शासनाने डिसेंबर २०२३ पर्यंत गोवर रूबेला आजाराचे दुरीकरण करण्याचे ध्येय निश्चित केले असून, यासाठी चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात ऑगस्ट महिन्यापासून तीन फेऱ्यांमध्ये विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० कार्यक्रम चंद्रपूर मनपातर्फे राबविण्यात येणार आहे.
यासंदर्भात सिटी टास्क फोर्स समितीची आढावा बैठक आयुक्त विपीन पालीवाल यांच्या निर्देशानुसार २७ जुलै रोजी उपायुक्त मंगेश खवले यांच्या अध्यक्षतेखाली मनपा सभागृहात घेण्यात आली.याप्रसंगी डॉ. वनिता गर्गेलवार,डॉ. साजिद, आयएमए व आयएपीचे प्रतिनिधी उपस्थीत होते. विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० या मोहिमेंतर्गत झीरो ते दोन वर्ष वयोगटांतील लसीकरणापासून वंचित किंवा गळती झालेल्या लाभार्थ्यांचे सर्व लसींद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे. दोन ते पाच वयोगटांतील ज्या बालकांचे गोवर रूबेला लसीचा पहिला व दुसरा डोस राहिला असेल, तसेच डीपीटी व ओरल पोलिओ लसीचा बूस्टर डोस राहिला असेल त्यांचेही लसीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गर्भवती महिला यांचे लसीकरण कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणाऱ्या लसीद्वारे लसीकरण करण्यात येणार असून, ६ ऑगस्ट २०१८ किंवा त्यानंतर जन्मलेल्या बालकांचा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे.
दरम्यान, विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० मोहीम ही पहिला टप्पा ७ ते १२ ऑगस्ट, दुसरा टप्पा ११ ते १६ सप्टेंबर तर तिसरा टप्पा ९ ते १४ ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत मोठ्या प्रमाणात झीरो डोस, सुटलेले व वंचित राहिलेले लाभार्थी असलेले क्षेत्र, गोवर आजारासाठी अतिजोखमीचा भाग, नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत नवीन लसींचा समावेश केल्यानंतर कमी काम असलेले क्षेत्र, जास्त दिवस नियमित लसीकरण सत्र न घेतलेले क्षेत्र, स्थलांतरित होणारा भाग, गोवर-घटसर्प व डांग्या खोकला, २०२२-२३ या वर्षात उद्रेकग्रस्त भाग, लसीकरणास नकार देणारे व प्रतिसाद न देणारे क्षेत्र यात विशेष मेहनत घेतली जाणार असून, यात लसीकरण करून घेण्यात येणार आहे.
मिशन इंद्रधनुष्यकरिता मनपा आरोग्य विभागामार्फत ८७ लसीकरण केंद्रे व ७ मोबाईल टीम तयार करण्यात आल्या आहेत. आपली बालके निरोगी व सुदृढ राहण्यासाठी नियमित लसीकरण करणे गरजेचे आहे. कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू न देण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.