पशुसंवर्धनाअंतर्गत अनुदान उपलब्ध पशुसंवर्धन विभागाकडून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

पशुसंवर्धनाअंतर्गत अनुदान उपलब्ध पशुसंवर्धन विभागाकडून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

गडचिरोली, दि.19:केंद्र शासनाने सन 2021-22 या वर्षापासुन पशुसंवर्धनाव्दारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारीत नविन सुधारीत राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेस मंजुरी प्रदान केलेली आहे. सदर योजनेअंतर्गत शेळी-मेंढीपालन, कुक्कूटपालन, पशुखाद्य व वैरण विकास उपअभियाना अंतर्गत मुरघास निर्मीती, टीएमआर व फॉडर ब्लॉक निर्मिती तसेच वैरण बियाणे उत्पादन या योजनेकरीता 50 टक्के अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

अनुदानाची अधिकतम मर्यादा शेळी-मेंढी पालनाकरीता (100 मादी + 5 नर) करीता रु.10 लक्ष, (200 मादी + 10 नर) करीता रु.20 लक्ष, (300 मादी + 15 नर) करीता रु.30 लक्ष, (400 मादी + 20 नर) करीता रु.40 लक्ष, (500 मादी + 25 नर) करीतारु. 50 लक्ष अशी आहे.

कुक्कूट पालनाकरीता रु.25 लक्ष, वराह पालनाकरीता (50 मादी + 5 नर) करीता रु. 15 लक्ष, (100 मादी + 10 नर) करीता रु.30 लक्ष आणि पशु खाद्य व वैरण विकास यासाठी रु.50 लक्ष अशी आहे. प्रकल्पाकरीता स्व हिस्सा व्यतिरिक्त उर्वरीत आवश्यक निधी बँकेकडुन कर्जाव्दारे उपलब्ध करुन घ्यावयाचा आहे.

सदर योजनेचा लाभ व्यक्तीगत व्यावसायीक, स्वंयसहाय्यता बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी सहकारी संस्था, कलम 8 अंतर्गत स्थापन झालेल्या कंपनी, सहकारी दुध उत्पादक संस्था, सहजोखिम गट (जेएलजी) सहकारीसंस्था, खाजगी संस्था, स्टार्टअप ग्रुप इ. घेवु शकतात.

सदर योजनांच्या लाभाकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावयाचा असुन, अर्ज सादर करताना सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) पॅनकार्ड, आधारकार्ड, रहिवाशी पुरावा (मतदान ओळखपत्र, वीज देयकाची प्रत) छायाचित्र, बँकेचा रदद केलेला चेक इ. सादर करणे (अपलोड) अनिवार्य असुन अनुभवाचे प्रमाणपत्र, वार्षिक लेखामेळ, आयकर रिटर्न, प्रशिक्षण प्रमाणपत्र, जमिनीचे कागदपत्र, जीएसटी नोंदणी इ. उपलब्ध असल्यास सादर करावे.

सदर योजनेच्या सर्व मार्गदर्शक सुचना वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न, अर्जाचा नमुना इ. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळ http://ahd.maharashtra.gov.in व केंद्र शासनाच्या संकेतस्थळ http://www.nlm.udyamimitra.in यावर उपलब्ध आहे. तरी गडचिरोली जिल्हयातील जास्तीत जास्त ईच्छुक व्यक्तीनी, स्वयंम सहायत्त्ता बचतगट, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी संस्था, कलम 8 अंतर्गत स्थापन झालेल्या कंपनी, सहकारी दुध उत्पादक संस्था, सहकारी संस्था, खाजगी संस्था यांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. विलास गाडगे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, गडचिरोली यांनी केले आहे.असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, गडचिरोली डॉ. विलास अ. गाडगे यांनी कळविले आहे.