विभागांनी वेळेत प्रस्ताव सादर करावे- जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

विभागांनी वेळेत प्रस्ताव सादर करावे- जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

 

भंडारा दि.27: जिल्हा नियोजन समितीतर्फे सन 2023-24 मध्ये प्रस्तावित केलेल्या विविध कामांच्या बाबतीतील परिपूर्ण प्रस्ताव विभागांनी वेळेत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज जिल्हा नियोजन समिती सभागृह येथील आयोजित बैठकीत दिले.

 

यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी शशीकुमार बोरकर यांनी सादरीकरण केले. तर व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, उपवनसंरक्षक राहुल गवई, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

 

जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या आर्थिक वर्षातील विविध विभागाच्या कामाचा आढावा यावेळी घेतला. तसेच सर्व कार्यालयांना खर्चित आणि अखर्चित निधीचा आढावा घेतला. सन 2023-24 या वर्षात योजना निहाय राबवण्यात येणाऱ्या विविध विभागांच्या कामांची यादी, परिपूर्ण प्रस्ताव, तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता याबाबतचा संबंधित विभागाचा पाठपुरावा व कामाचे अंतिम स्वरूप याविषयी त्यांनी विभागप्रमुखांशी चर्चा केली. जिल्ह्यात सध्या ई-ऑफिस कार्यरत झालेले असून सर्व विभागांनी आपल्या कार्यालयातील पत्र व्यवहार ई-ऑफिस द्वारे करण्याचे देखील त्यांनी निर्देश यावेळी दिले.