अभिनेत्री तृप्ती भोईर गडचिरोली जिल्ह्यातील कलावंतांना घेऊन चित्रपट तयार करणार….

अभिनेत्री तृप्ती भोईर गडचिरोली जिल्ह्यातील कलावंतांना घेऊन चित्रपट तयार करणार….

गडचिरोली : खासदार अशोक नेते यांचे स्वागत करताना अभिनेत्री तृप्ती भोईर.

जिल्ह्यातील कलावंत सिनेसृष्टीला अप्रतिम कलाकृतीची भेट देतील

अभिनेत्री तृप्ती भोईर यांच्या आगामी चित्रपटाचे आॅडीशन

गडचिरोली, ता. २० : अतिदुर्गम, उद्योगविरहीत, नक्षलग्रस्त, अनेक समस्यांनी गांजलेला, देशातील आकांक्षित जिल्हा अशी गडचिरोली जिल्ह्याची ओळख असली तरी इथल्या नागरिकांकडे इथल्या निसर्गासारखीच कलागुणांची समृद्धी आहे. त्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्री तृप्ती भोईर यांच्या आगामी चित्रपटात काम करणारे जिल्ह्यातील कलावंत सिनेसृष्टीला अप्रतिम कलाकृतीची भेट देतील, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.

टुरींग टाॅकीज, अगडबंब चित्रपटफेम अभिनेत्री तृप्ती भोईर कुर्माघर प्रथेवर गडचिरोली जिल्ह्यात येथीलच कलावंतांना घेऊन चित्रपट तयार करत असून या चित्रपटाची आॅडीशन सोमवार (ता. १९) स्थानिक वैभव हाॅटेल येथे पार पडली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला अभिनेत्री तृप्ती भोईर, प्लॅटिनम ज्युबिली एज्युकेशन सोसायटीचे महासचिव अझिझ नाथानी, पत्रकार मिलिंद उमरे, चित्रपटाचे कार्यकारी निर्माते तुषार पाखरे, विशाल कपूर आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे मार्गदर्शन करताना खासदार अशोक नेते म्हणाले की, गडचिरोली जिल्हा प्रगतीच्या निकषात मागे असला, तरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात देशासह जिल्ह्यानेही बरीच प्रगती केली आहे. या लोकसभा क्षेत्राचा खासदार म्हणून मागील नऊ वर्षात आपण जिल्ह्याच्या चौफेर प्रगतीसाठी कसोशिने प्रयत्न केले. जिल्ह्यात वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. धानोरामार्गे छत्तीसगडपर्यंत जाणारा रेल्वे मार्गही मंजूर करून घेतला. जिल्ह्यात महामार्गांची निर्मिती झाली असून गडचिरोली शहरातील वाहतूक सोडविणारा बायपास मार्गही लदकरच होणार आहे. जिल्ह्यातील सिंचन समस्या सोडविण्यासाठीही आपण भरीव प्रयत्न केले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांमध्ये कलागुणांची अजिबात उणीव नाही. तृप्ती भोईर यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून आदिवासी समाजातील महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नावर प्रकाश टाकला आहे. या चित्रपटात स्थानिकांना घेण्याचा त्यांचा निर्णय अतिशय योग्य आहे. या जिल्ह्यातील कलावंतांनी चित्रपटात जीव ओतून काम करावे. हा चित्रपट नक्कीच जगभरात गाजेल. या उपक्रमासाठी कोणतीही गरज असल्यास या क्षेत्रातील खासदार म्हणून आपण शक्य ती सर्व मदत करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. कुर्माघरावर आधारीत या चित्रपटाच्या निर्मात्या, दिग्दर्शिका तथा अभिनेत्री तृप्ती भोईर म्हणाल्या की, चित्रपटाचे समाजावर प्रभाव टाकणारे सशक्त माध्यम आहे. त्यामुळे या माध्यमातून समाजातील समस्याही मांडणे गरजेचे आहे. म्हणून या वेगळ्या विषयावर हा चित्रपट करायचा निर्णय घेतला. इथल्या नागरिकांमध्ये कलागुण ठासून भरलेले आहेत.त्यामुळे त्यांच्या साथीने हा चित्रपट सिनेसृष्टीतील एक अजरामर कलाकृती नक्की होईल, असेही त्या म्हणाल्या.

मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद….

कुर्माघर प्रथेवर आधारीत गडचिरोली जिल्ह्यातच आणि इथल्याच कलाकारांना घेऊन तृप्ती भोईर तयार करत असलेल्या या चित्रपटाच्या आॅडीशनला गडचिरोली जिल्ह्यातील कलावंत, नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हाॅटेल वैभव येथे सकाळपासून सायंकाळपर्यंत कलावंतांची गर्दी होती. शिवाय या आॅडिशन दरम्यान काही कलावंतांच्या समुहांनी पारंपरिक आदिवासी नृत्यही सादर केले.