महिलांचे सिबिल रेटिंग उत्तम करणे गरजेचे- रुपा मेस्त्री

महिलांचे सिबिल रेटिंग उत्तम करणे गरजेचे- रुपा मेस्त्री

· माविम, भंडारामार्फत सन 2023-24 क्रेडिट प्लॅन सेमिनार संपन्न

 

भंडारा, दि. 20 : बचत गटातील महिलांच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने माविममार्फेत विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. विविध बॅंकांच्या मदतीने बचत गटांना कर्ज पुरवठा करून दिला जातो, ह्या कर्जाची परतफेड नियमितपणे सुरू असते. बचत गटांच्या कर्जाची रक्कम वाढीसाठी महिलांचे सिबिल रेटिंग सशक्त व चांगले करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माविम मुंबईच्या कार्यक्रम व्यवस्थापक रुपा मेस्त्री यांनी केले.

 

महिला आर्थिक विकास महामंडळ, भंडाराच्या आज दि. 19 जून 2023 रोजी सोमवारी जिल्हा नियोजन सभागृह येथे सन 2023-24 या वर्षातील क्रेडिट प्लॅन सेमिनार संपन्न झाले. त्यावेळी त्या ऑनलाईन पद्धतीने बोलत होत्या. याप्रसंगी माविम, मुंबईच्या कार्यक्रम व्यवस्थापक रुपा मेस्त्री यांनी राज्यातील बचत गटांच्या आर्थिक प्रगतीचा आढावा सादर केला. यावेळी मंचावर जिल्हा नियोजन अधिकारी श. क. बोरकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शिवणकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी मनिषा पाटील, जिल्हा खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्री. देविपुत्र, आयसीआयसीआय बँकेचे सुहास बोबडे, एचडीएफसी बॅंकेचे सुरज साबळे, बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या क्रेडिट कृषी अधिकारी सोनल भरतकर, बॅंक ऑफ बडोदाचे राहुल ठाकूर, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे उपस्थित होते.

 

यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शिवणकर यांनी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी मनिषा पाटील त्यांच्या विभागातील योजनांची माहिती दिली.

 

या सेमिनारचे प्रास्ताविक माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे यांनी केले. तसेच जिल्ह्यातील बचत गटांच्या मागील आर्थिक प्रगतीचा आढावा व नियोजनाचे सादरीकरण केले. यावेळी सूत्रसंचालन सल्लागार मनोज केवट यांनी केले तर आभार सहायक जिल्हा समन्वय अधिकारी मोहन घनोटे यांनी केले.

 

यावेळी बॅंकांचे प्रतिनिधी, लोकसंचालित साधन केंद्राचे व्यवस्थापक, उपजीविका सल्लागार, सहयोगीनी उपस्थित होत्या.