जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयांमध्ये ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित

जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयांमध्ये ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित

· जून महिन्यात आजपर्यंत 398 फाईलींचा निपटारा

 

भंडारा, दि. 19 : एप्रिल 2023 पासून केंद्र शासनाने गतिमान ई-ऑफिस राबवत आहे. ई ऑफीस प्रणालीने शासकीय कामकाजातील वेळकाढूपणाला छेद दिला असून कामकाजाला वेग आला आहे. जून महिन्यात आजपर्यंत 398 फाईलींचा निपटारा करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर सातत्याने याबाबत आग्रही असून सर्व तहसिल कार्यालयांमध्ये ई- ऑफिस प्रणाली सुरू करण्यात आली आहे. जिल्हा पातळीवर महा आयटी सेलचे फारूक शेख या कामाचे नियंत्रण करत आहे.

 

सुरुवातीच्या काळात केवळ मंत्रालय व राज्यस्तरीय कार्यालयांमध्ये या प्रणालीचा अवलंब केला जात होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालये ई-ऑफिसने जोडली गेली. सर्वस्तरावरील शासकीय कामकाज या प्रणालीद्वारे करण्याचे शासनाचे धोरण आहे. शासकीय कामकाज अधिक स्मार्ट व गतिमान होण्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांना जलद, पारदर्शक आणि कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ई-ऑफिस प्रणाली राबविली जात आहे.

 

तालुकास्तरावर ही गतीमान प्रणाली राबविण्यासाठी तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. तांत्रिक सहाय्य महाआयटीच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आले. नागरिकांची कामे गतीने व्हावी, त्यांचा त्रास आणि पैसा वाचावा यासाठी ही प्रणाली अत्यंत उपयोगी ठरली आहे. शासकीय विभागांच्या फाईल्स प्रत्यक्ष या टेबलवरुन त्या टेबलवर फिरतात. ई-ऑफिसच्या पेपरलेस कामकाजामुळे फाईली ऑनलाईन सादर होतात आणि ऑनलाईनच पुढे जात असल्याने फाईलींचा निपटारा वेळेत होतो, शिवाय कामात पारदर्शकता, गतिमानता देखील येते. नागरिकांचे कार्यालयात येणारे अर्ज, विनंत्या, तक्रारी देखील ई-ऑफिसद्वारे सादर होत असल्याने त्यावर देखील कालमर्यादेत कारवाई होते.

 

कामकाजात गति व पारदर्शकता- जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

 

शासकीय कामकाज गतिमान आणि पारदर्शक करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे ई-ऑफिससारखी प्रणाली अमलात आणली आहे. सुरुवातीस आपण उपविभागीय कार्यालये ई-ऑफिस केली. आता सर्वच तहसिल कार्यालये या प्रणालीने जोडल्या गेली आहे. ई-ऑफिसमुळे कामे गतीने होतात. शासकीय फाईलींचा निपटारा लवकर होतो. नागरिकांना कमी त्रासात, कमी वेळेत सेवा उपलब्ध होते, असे जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी सांगितले.