इतर मागासवर्ग प्रवर्गातील पात्र व्यक्तींसाठी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना

इतर मागासवर्ग प्रवर्गातील पात्र व्यक्तींसाठी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना

चंद्रपूर, दि.27 जुलै :महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्गीय प्रवर्गातील पात्र घटकांसाठी शिक्षण, रोजगार व स्वयंरोजगारासाठी सहाय्य करणाऱ्या विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा जिल्हयातील इच्छुक पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रु. 10 लाखापर्यंत):

योजनेची महत्तम कर्ज मर्यादा 10 लक्ष रुपयापर्यंत असून बँकेने रु. 10 लाखापर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या प्रकरणात उमेदवाराने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम 12 टक्केच्या मर्यादेत त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. तर परतफेडीचा कालावधी हा बँक निकषानुसार राहील.

गट कर्ज व्याज परतावा योजना( रु. 10 ते 50 लाखापर्यंत):

सदर योजना महामंडळ निकषानुसार विहित केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत) एल.एल.पी, एफ.पी.ओ अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थांना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारणीकरीता जे कर्ज दिले जाईल, त्या कर्ज रकमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणीकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल. बँकेकडून प्रती गटास कमीत कमी रु. 10 लक्ष ते जास्तीत जास्त 50 लक्षपर्यंतच्या मंजूर उद्योग उभारणी करिता अर्थसहाय्य मिळेल. तसेच मंजूर कर्जावर 5 वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल ते, कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्ता भरल्यावर जास्तीत जास्त 12 टक्के व्याजदराच्या आणि 15 लक्ष रुपयाच्या मर्यादेत एकूण व्याजाची रक्कम त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.

योजनेचे निकष:

अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी व इतर मागास प्रवर्गातील असावा. अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागाकरिता रु. 8 लाखापर्यंतच्या मर्यादेत असावे. अर्जदाराने मध्येच नियमित कर्ज परतफेड न केल्यास व्याज परतावा दिला जाणार नाही.

योजनेच्या अधिक माहितीसाठी महामंडळाचे जिल्हा कार्यालय, जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय दूध डेअरीजवळ, जल नगर वार्ड, चंद्रपूर अथवा 07172-262420 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.