लाखनी तालुक्यातील दहा गावातील विकास कामांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट व पाहणी

लाखनी तालुक्यातील दहा गावातील विकास

कामांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट व पाहणी

· जलयुक्त, रोहयो व शेतकरी उत्पादक कंपन्यांना भेट

 

भंडारा, दि. 17 : लाखनी तालुक्यातील गडेगाव, लाखोरी, मासलमेटा, मोरगाव, मोरगाव (राजेगाव), सिंदीपार, रेंगेपार (कोहळी), गुरढा, लाखनी, पलाडी या गावातील सुरू असलेल्या विकास कामांना आज जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी भेट देऊन पाहणी केली.

 

गडेगाव येथील रोहयो अंतर्गत नाला सरळीकरणाच्या कामास भेट दिल्यानंतर जलजीवन मिशनची उरलेली कामे व नळाची नवीन जोडणीचे कामे करण्याची सूचना त्यांनी गटविकास अधिकारी श्रीमती डोंगरे यांना दिली. त्यांनतर लाखोरी व मासलमेटा येथील बंधाऱ्याच्या गाळ काढण्याच्या कामाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित मजुरांशी चर्चा केली. मजुरांच्या सर्व अडचणी जाणून घेतल्या तसेच त्यांना अटल घरकुल योजनेमध्ये अर्ज करावे. आयुष्यमान कार्ड व केंद्र सरकारच्या विमा योजनांचे लाभ घेण्याचे आवाहन केले. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतील लाभार्थी मनोहर पटले यांच्या मोरगाव (राजेगाव) येथील फळबागेस भेट देऊन पाहणी केली. श्री. पटले यांनी केलेल्या केशरी आंब्याच्या प्रजातीची माहिती जाणून घेतली.

 

मोरगाव येथील मामा तलावातील गाळ काढण्याच्या कामात त्रुटी आढळून आल्याने त्या त्रुटी पुर्तता वेळेत करुन घेण्याचे निर्देश त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले. सिंदीपार येथील मामा तलावातील गाळ काढण्याच्या कामावर 502 मजुरांची उपस्थिती होती. जिल्हाधिकाऱ्यांनी तेथील मजुरांना कामातील अडचणी व कामाचे वेतन नियमित मिळते का ? अशी विचारणा केली. आजच्या दौऱ्यामध्ये लाखनी तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. त्यामध्ये शिवनी शेतकरी उत्पादक कंपनी, रेंगेपार (कोहळी), कनेरी शेतकरी उत्पादक कंपनी, गुरढा, व्हेजग्रो शेतकरी उत्पादक कंपनी, लाखनी यांना भेट देऊन त्यांच्या कामाची विस्तृत माहिती घेतली. यावेळी प्रकल्प संचालक (आत्मा) उर्मिला चिखले, श्री. गायधने यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कामाची माहिती दिली.

 

दौऱ्याच्या शेवटी पलाडी येथील ईव्हीम गोडाऊन बांधकामाची पाहणी केली. या संपूर्ण दौऱ्यात सकाळी आठ वाजता पासून तर दुपारी दोन वाजेपर्यंत रणरणत्या उन्हात जिल्हाधिकारी महोदय गाव शिवारात सुरू असलेल्या कामांना आवर्जून भेट देऊन पाहणी करत आहेत. आतापर्यंत पवनी, मोहाडी, तुमसर व भंडारा या तालुक्यांचे दौरे केले असून उर्वरित तालुक्यांना लवकरच भेट देणार आहेत.

 

आजच्या दौऱ्यात जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांच्या समवेत सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीपती मोरे, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ उपस्थित होत्या.