मनपा करणार २५ हजार वृक्षाची लागवड ; ५.६ टक्के हरित क्षेत्र वाढविण्याची गरज

वृक्षारोपण मोहीमेस सर्वांचे सहकार्य आवश्यक – आयुक्त विपीन पालीवाल

मनपा करणार २५ हजार वृक्षाची लागवड

५.६ टक्के हरित क्षेत्र वाढविण्याची गरज

 

चंद्रपूर १६ जुन – चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात मनपातर्फे २५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असुन या मोहीमेत शहरातील सर्व नागरीक, स्वयंसेवी संस्था,लोकप्रतिनिधी यांचा सहभाग अतिशय आवश्यक असुन मोहीमेस सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले आहे.

आज आपण वृक्ष लावले तर येत्या १० ते १५ वर्षानंतर त्या वृक्षाची सावली आपणास मिळेल, आपल्या शहराची वाढती उष्णता पाहता वृक्षाचे महत्व आजच समजुन घेणे आवश्यक आहे.प्रखर उन्हात आपण पाहतो की फेरीवाले,भाजीवाले हे वृक्षाखालीच उभे असतात,कार,टू व्हीलरची पार्कींग सुद्धा झाडाखालीच केली जाते, मग आपण गाडी लावण्यास जेव्हा झाड शोधतो तर झाडे लावण्यास जागा शोधणेही आवश्यक असल्याचे आयुक्तांनी सांगीतले.

चंद्रपूर जिल्ह्यात येत्या पावसाळ्यात वटवृक्ष, कडूनिंब यासह इतर एकूण १० लक्ष वृक्ष लागवड महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. सदर वृक्ष लागवडीसाठी कृती आराखडा तयार करण्यात येत असुन महानगरपालिकेतर्फे २५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.यात लोकसहभाग वाढावा म्हणून आयुक्त विपीन पालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक १२ जून रोजी मनपा सभागृहात घेण्यात आली.

पर्यावरण रक्षणासाठी हरित क्षेत्राचा समतोल राखणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. एकूण क्षेत्रफळाच्या ३३ टक्के क्षेत्र हरित असणे आवश्यक आहे. चंद्रपूर शहरामध्ये वन भाग व वृक्ष गणनेनुसार हरित क्षेत्र हे २७. ६ टक्के आहे त्यामुळे ३३ टक्के हरित क्षेत्र पुर्ण करण्याकरीता ५.६ टक्के हरित क्षेत्र वाढविण्याची आवश्यकता असल्याने वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येत आहे.

मनपातर्फे वृक्ष लागवड मोहिमेची सुरवात श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी क्रीडा संकुल येथे ११ वटवृक्ष लावुन तसेच बाबुपेठ स्मशानभुमी येथेही वटवृक्ष व कडुलिंबाचे वृक्ष लाऊन करण्यात आली आहे.महानगरपालिका क्षेत्रात १२१ अभिन्यासातील खुली जागा व २७ मनपा शाळेत १००० वटवृक्ष, ओपन स्पेस व इतर ठिकाणी ३८०० कडूनिंब वृक्ष तसेच उद्याने,रस्त्याच्या बाजुला अश्या जागी २०२०० असे एकुण २५ हजार वृक्ष महानगरपालिकेतर्फे लोकसहभागातुन लावण्यात येणार आहेत.काही जागी एकाच प्रजातींची झाडे लावुन त्यांना गुलमोहर रोड,चाफा रोड, कडुलिंब रोड असे नावे देण्याचाही मनपाचा प्रयत्न असणार आहे.लोकसहभाग वाढविण्यास ” सुंदर माझे उद्यान ” व ” सुंदर माझी ओपन स्पेस ‘ स्पर्धासुद्धा महानगरपालिकेमार्फत घेण्यात येणार आहे.

याप्रसंगी इको प्रोचे बंडु धोत्रे यांनीही मार्गदर्शन केले तसेच माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी त्यांच्या प्रभागातील १९ ओपन स्पेस जागेत लोकसहभागाने वृक्षारोपण करण्याची इच्छा दर्शविली तसेच इतर सर्व स्वयंसेवी संस्थांनी झाडे लावण्यास जागा शोधुन वृक्षारोपण करणे व संवर्धनाची तयारी दर्शविली.या मोहीमेत सहभागी होण्यास व वृक्षारोपण करण्यास जागा सुचविण्यासाठी या ८६६८७०८४३५ क्रमांकावर संपर्क साधावा अथवा https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScsWGwnvDz6Bp2ooA6hGT3aCYVHhJIUGKRIyekEQJqKMtrInw/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0 या गुगलिंकवर माहीती भरावी.

बैठकीस पतंजली योग समिती, योगनृत्य परिवार, गुरुदेव सेवा मंडळ, आरुषी सोशल फाऊंडेशन,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता मंडळ,रोटरी क्लब,श्री.स्वामी समर्थ बालोद्यान,भारत स्वाभिमान,गार्डन क्लब या सर्व स्वयंसेवी संस्थांचे सदस्य उपस्थीत होते.