३१५० किलो प्लास्टीक जप्त बागला चौक येथील गोडाऊनवर कारवाई

३१५० किलो प्लास्टीक जप्त बागला चौक येथील गोडाऊनवर कारवाई

 

चंद्रपूर १४ जुन – बागला चौक येथील एका गोडाऊन वर चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने मंगळवार १३ जुन रोजी संध्याकाळच्या सुमारास कारवाई करून ३१५० किलो प्लास्टीक जप्त केले आहे शिवाय प्लास्टीकचा साठा करणाऱ्या गोडाऊन मालकास २५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

बागला चौक येथील कोठारी यांच्या मालकीच्या गोडाऊन येथे मोठ्या प्रमाणात प्लास्टीक साठा केला गेला असल्याची माहीती मनपा उपद्रव शोध पथकास मिळाली होती. माहितीच्या आधारे पाहणी केली असता सदर साठा हा मलपत सिंग यांच्या नावे आढळला असुन कोठारी यांच्या गोडाऊन मधे उतरविण्यात आला होता.बंदी असलेल्या प्लास्टीकचा साठा केल्याने सदर माल जप्त करण्यात आला असुन गोडाऊन मालकास २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात १ जुलै २०२२ पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर ५ हजार रुपयांपर्यंत दंड,दुसऱ्यांदा वापर केल्यास १० हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५ हजार रुपये दंड आणि ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे.

मनपा हद्दीत प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास सातत्याने कारवाई केली जात असुन प्लास्टीक पिशवीला पर्याय म्हणुन मनपामार्फत विकल्प थैला नागरीकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. आतापर्यंत ७२३ दुकानदारांनी विकल्प थैलाच्या वापरास सुरवात केली असुन मनपाद्वारे ४०५५७ कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले आहे.

सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ. अमोल शेळके,अतिक्रमण निर्मूलन अधिकारी संतोष गर्गेलवार,स्वच्छता निरीक्षक जगदीश शेंद्रे,मनीष शुक्ला,अनिल खोटे, भरत बिरिया, बंडू चहरे विक्रम महातव,डोमा विजयकर,अमरदीप साखरकर यांनी केली.