खेळाडूंना प्रशिक्षण व इतर बाबीसाठी आर्थिक सहाय्य करणे बाबत प्रस्ताव सादर करावेत

खेळाडूंना प्रशिक्षण व इतर बाबीसाठी आर्थिक सहाय्य करणे बाबत प्रस्ताव सादर करावेत

 

गडचिरोली,दि.13: राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना व संवर्धन परिणामकारक करण्याच्या दृष्टीने तसेच राज्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करुन पदक विजेते खेळाडू तयार व्हावेत यासाठी क्रीडा विषयक तंत्रशुद्ध प्रशिक्षण, खेळाडूंच्या दर्जात सुधारणा, दर्जेदार पायाभूत सुविधा, खेळाडूंचा गौरव, क्रीडा प्रशिक्षकांना अद्यावत तंत्रज्ञानाची ओळख या बाबी विचारात घेऊन क्रीडा धोरण 2012 तयार करण्यात आले आहे. या अंतर्गत राज्यातील खेळाडूंना अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील खेळाडूंना आर्थिक सहाय्य देणे बाबतचा संदर्भिय शासन निर्णय पारीत झाला आहे. शासन निर्णयान्वये ही योजना संचालनालय स्तरावर कार्यान्वित आहे. सदर शासन निर्णयातील अ.क्र. 1 अन्वये नमूद 14 अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना पुढील बाबींसाठी अर्थसहाय्य अनुज्ञेय आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा प्रवास खर्च, प्रवेश शुल्क, निवास, भोजन इ. , देश विदेशातील स्पर्धापूर्व प्रशिक्षण उपकरणे, तज्ञ क्रीडा प्रशिक्षकांचे मार्गदर्शन शुल्क, प्रशिक्षण कार्यक्रम शुल्क. 3. आधुनिक क्रीडा साहित्य आयात / खरेदी करणे, गणवेश इत्यादी. या योजनेसाठी पुढील स्पर्धा अधिकृत स्पर्धा म्हणून मान्यता दिली आहे. ऑलिंम्पिक गेम्स ,एशियन चॅम्पियनशिप , पॅरा एशियन स्पर्धा , विश्व अजिंक्यपद स्पर्धा , युथ ऑलिम्पिक , ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप , एशियन गेम्स , ज्यु. विश्व अजिंक्यपद स्पर्धा , एशियन कप , राष्ट्रकुल स्पर्धा , शालेय आशियाई / जागतिक स्पर्धा , वर्ल्ड कप , राष्ट्रकुल युवा स्पर्धा , पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा ऑलिम्पिक स्पर्धामध्ये ज्या खेळ / क्रीडा प्रकारांचा समावेश असेल तेच खेळ / क्रीडा प्रकार वरील नमूद इतर स्पर्धामध्ये आर्थिक सहाय्य मिळण्यास अनुज्ञेय होतील. मात्र अपवाद कबड्डी, खो-खो, मल्लखांब या देशी खेळांचा अपवाद उपरोक्त शासन

निर्णयान्वये करण्यात आलेला आहे. उपरोक्त विविध अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किंवा सहभागी झालेल्या खेळाडूंना या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरुन आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली किंवा आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे यांचेकडे सादर करण्याचे आवाहन डॉ. सुहास दिवसे, आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केले आहे. अर्जाचा नमुना क्रीडा विभागाच्या sports.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. याबाबत अधिक माहिती करिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली किंवा क्रीडा व युवक सेवा संचालनालय, शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथील कार्यालयाशी संपर्क करावा.

.