विशेष वृत्त/ थेट लाभ नागरिकांच्या हातात…

विशेष वृत्त/ थेट लाभ नागरिकांच्या हातात…

· जिल्हयात शासन आपल्या दारी अभियानात 78 हजाराहून अधिक लाभार्थ्यांना लाभ

· अनेक योजनांचे लाभ थेट हातात मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान

 

भंडारा, दि. 24 मे : जिल्हयाचे सर्वोच्च प्रशासकीय पद म्हणजे जिल्हाधिकारी विदयमान जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी शासन आपल्या दारी अभियानात अतिशय सुक्ष्म नियोजनाने अभियानाच्या सुरूवातीपासूनच बैठका, क्षेत्र भेटी, यंत्रणांचा पाठपुराव्याबाबत लक्ष दिले. प्रशासनाने कोरोनाच्या उद्रेकानंतर जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात थेट संपर्काद्वारे लाभ दिल्याने शासन आपल्या दारी या मोहिमेत जिल्हयाने आघाडी घेतली आहे. या अभियानाचे सकारात्मक चित्र जिल्ह्यात उमटले आहे.

 

उपजिल्हाधिकारी अर्चना यादव यांच्या नियंत्रणात या अभियानाची दररोजची माहिती संकलीत करून शासनाकडे पाठविण्यात येत आहे. आजपर्यत जिल्ह्यात 78 हजाराहून अधिक लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात आले. लाभामध्ये शासकीय प्रमाणपत्र, आरोग्या मेळाव्याव्दारे रूग्णांना लाभ, दिव्यांग प्रमाणपत्र वाटप, पत्रकार पास सवलत, विदयार्थी पास सवलत, ठिबक सिंचन योजना, व्यवसाय नाहरकत प्रमाणपत्र, वीज कनेक्शन, शासकीय आश्रमशाळेतील अनुसुचीत जमाती विदयार्थ्याना प्रवेश देणे, युवा अनुदान, महसूल विभागातर्फे देण्यात येणारे विविध दाखले यासह 100 हून अधिक लाभांचे वाटप करण्यात आले आहे.

 

शासकीय योजनासाठी शासकीय कार्यालयात सामान्य नागरिकांनी जावे या संकल्पनेला छेद देत प्रशासन व शासनच थेट लाभार्थ्याच्या दारी जात असल्याने सामान्य नागरिकांचे शासन असा सकारात्मक संदेश जात आहे.

 

शासन आपल्या दारी या अभियानात उन्हाळा पाहता लाभ वाटप कार्यक्रम शक्यतो सकाळच्या वेळेत ठेवण्यात येत आहेत. हे अभियान 15 जूनपर्यंत राबविण्यात येणार आहे. जिल्हयाला 75 हजार लाभार्थ्यापर्यत लाभ पोहोचवणे अपेक्षीत असतांना जिल्हा प्रशासनाने उद्दीष्टाच्या पुढे जात 78 हजार 232 लाभार्थ्याना थेट लाभ दिले आहेत.

 

पवनी तालुक्यातील 3 हजार 806 लाभार्थ्यांना थेट लाभ

 

शासन आपल्या दारी अभियानाचा मुख्य उद्देश शासनाच्या योजनांचा, उपक्रमांचा लाभ सर्वसामान्यांना त्वरित मिळावा हा आहे. या अभियानातंर्गत तहसिल कार्यालय, पवनीमार्फत सर्वात जास्त 1 हजार 447 मिळकतीच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे.

 

शासन आपल्या दारी अभियानात तहसिल कार्यालय, पवनीमार्फत एकूण 3 हजार 806 लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात आले आहे. यामध्ये 415 जात प्रमाणपत्राचे वाटप, 273 अधिवास प्रमाणपत्राचे वाटप, 387 नॉन क्रिमीलीअर प्रमाणपत्राचे वाटप, 1 हजार 447 मिळकतीच्या प्रमाणपत्राचे वाटप, 237 प्रतिज्ञापत्र, 30 राष्ट्रीय कुटुंब योजना, 448 श्रावण बाळ निराधार योजना, 312 संजय गांधी निराधार योजना, 119 इंदिरा गांधी राष्ट्रीय वृधापकाळ निराधार योजना, 72 इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निराधार योजना, 1 इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निराधार योजना व 65 राशन कार्डचे लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले. जिल्ह्यात प्रत्येक शासकीय विभागामार्फत लाभार्थ्यांना त्यांचे लाभ शिबीराद्वारे मिळत असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांची सुलभता झाली आहे. तरी या अभियानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.