नागपूर येथील कॅन्सर रूग्णालयाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करणार- वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

नागपूर येथील कॅन्सर रूग्णालयाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करणार- वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. 16 :- नागपूर येथे १०० खाटांचे कॅन्सर रूग्णालय उभारण्याचा निर्णय ६ मार्च २०१९ रोजी घेण्यात आला होता. विविध कारणांनी हे काम पूर्ण होऊ शकले नाही. आता वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत हे काम करण्यात येत असून येत्या दीड ते दोन वर्षात रूग्णालयाचे बांधकाम पूर्ण करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य प्रवीण दटके यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

मंत्री श्री.महाजन म्हणाले, कॅन्सर रूग्णालयाच्या कामासाठी २०२१ साली निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. तथापि विविध कारणांनी काम होऊ शकले नाही. यानंतर यासंदर्भात नऊ सदस्यीय समिती नेमण्यात येऊन त्यांच्या अहवालानंतर वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत काम हाती घेण्यात आले आहे. राष्ट्रीय तंत्रविज्ञान संस्थेमार्फत (एनआयटी) रूग्णालयाचे बांधकाम करण्यात येऊन लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. तसेच यंत्रसामग्री देखील तत्काळ खरेदी करण्यात येईल, असेही त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.