गर्भवती महिलांचे कोविड 19 लसीकरण अत्यावश्यक

गर्भवती महिलांचे कोविड 19 लसीकरण अत्यावश्यक

भंडारा,दि.27- केंद्र व राज्य शासनाचे वतीने गर्भवती महिलांकरिता कोविड 19 लसीकरणाची शिफारस करण्यात आली असून राज्यात 16 जुलै 2021 पासून गर्भवती महिलांच्या लसीकरणास सुरूवात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गर्भावस्थेत कोविड 19 संसर्ग होण्याचा धोका वाढत नाही. बहुतांश गर्भवती महिलांमध्ये लक्षणे दिसून येत नाही किंवा सौम्य स्वरूपाची लक्षणे दिसून येतात. परंतु त्यांची प्रकृती वेगाने खालावू शकते आणि त्याचा विपरित परिणाम गर्भावर देखील होऊ शकतो. कोविड 19 संसर्ग होऊ नये याकरिता गर्भवती महिलांनी सर्व प्रकारची खबरदारी घेणे महत्वाचे आहे. यामध्ये कोविड-19 लसीकरणाचा देखील समावेश आहे. त्यामुळे गर्भवती महिलांनी कोविड-19 लस घ्यावी अशी शिफारस करण्यात आली आहे.

कोविड-19 मुळे गर्भवती महिलांच्या आरोग्यावर कशा प्रकारे परिणाम होतो ?

जरी कोविड-19 संसर्ग झालेल्या बहुतांश (90 टक्क्याहून अधिक) महिलांना रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता भासत नसली तरी काही महिलांची प्रकृती वेगाने खालावत जाण्याची शक्यता असते. लक्षणे दिसून येणाऱ्या गर्भवती महिलांमध्ये आजाराची तीव्रता वाढण्याचा आणि मृत्यु होण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो असे दिसून आले आहे. जर आजाराची तीव्रता वाढली तर इतर बाधीताप्रमाणे गर्भवती महिलांना देखील रुग्णालयात दाखल केले पाहिजे. उच्च रक्तदाब, स्थुलता, 35 वर्षापेक्षा अधिक वय यासारख्या वैद्यकिय अवस्था असलेल्या गर्भवती महिलांमध्ये कोविड-19 आजाराची तीव्रता वाढण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो.

कोविड-19 मुळे संसर्गाचा परिणाम गर्भवती महिलांच्या बालकांवर कशाप्रकारे होतो ?

कोविड-19 संसर्ग झालेल्या मातांच्या बहुतांश (95 टक्क्यांहून अधिक) नवजात शिशुंची प्रकृती जन्माच्यावेळी अतिशय चांगल्या अवस्थेत असते. परंतु काही वेळा गर्भावस्थेदरम्यान झालेल्या कोविड-19 संसर्गामुळे अकाली प्रसूत होणे, शिशुचे वजन 2.5 किलोग्रॅमपेक्षा कमी असणे आणि क्वचीत प्रसंगी शिशु जन्मापूर्वी मृत असणे या संभाव्यता वाढू शकतात.

गरोदर मातांच्या लसीकरणावर विशेष लक्ष

जिल्ह्यात गरोदर मातांच्या लसीकरणाला सुरुवात झाली असून आतापर्यंत 203 गरोदर मातांचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रसूतीरोग तज्ञ यांचे मार्गदर्शनात गरोदर मातांचे लसीकरणावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत असून गरोदरपणात गरोदर मातेच्या इच्छेनुसार कोविड-19 लसीकरण करण्यात येत आहे. ग्रामीण व शहरी भागातील गरोदर मातांना लसीकरण करुन घेण्याबाबत आशा स्वयंसेविका व अंगणवाडी कार्यकर्ती यांचे मदतीने कोविड-19 लसीकरणानंतर त्यांचेवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. लसीकरणापासून होणारे फायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात येत असून जास्तीत जास्त गरोदर मातांचे लसीकरण पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. असे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांनी कळविले आहे.