महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना 893 टॅबचे शनिवारी वाटप टॅब मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे- सहाय्यक आयुक्त समाज कल्याण

महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना 893 टॅबचे शनिवारी वाटप टॅब मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे- सहाय्यक आयुक्त समाज कल्याण

 

भंडारा दि. 16: महात्मा जोतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर यांच्यातर्फे जेईई, निट या परिक्षाचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 893 टॅबचे वाटप शनिवार दिनांक 18 मार्च रोजी होणार आहे.

 

स्पर्धेच्या या डिजीटल युगात विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या मदतीने अभ्यासातील संदर्भ व इतर माहिती एका क्लिक वर उपलब्ध व्हावी यासाठी हे टॅब महत्वाचे ठरणार आहे. इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाचे महात्मा जोतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (महाज्योती) JEE/NEET/MHT-CET चे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब व डाटा सीमकार्ड देण्याची योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात JEE / NEET/MHT-CET प्रशिक्षणाकरीता नोंदणीकृत विद्यार्थ्यांना 893 टॅब व डाटा सीम वाटपाकरीता प्राप्त असून टॅब व डाटा सीम दि. 18 मार्च, 2023 रोजी वाटप करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांना महाज्योती संस्थेमार्फत टॅब व सीम मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यांना महाज्योती संस्थेमार्फत संदेशाव्दारे कळविण्यात आलेले आहे.

 

ज्या विद्यार्थ्यांना महाज्योती संस्थेमार्फत टॅब व सीम मंजूर करण्यात आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी दिनांक 18 मार्च 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिव्हील लाईन, (जि.प.चौक जवळ) भंडारा येथे विद्यार्थ्यांनी आधारकार्ड/ ओळखपत्र, पालकाचे आधारकार्ड/ ओळखपत्र, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, 10 वी चे गुणपत्रक, बोनाफाईड प्रमाणपत्र (असल्यास) कागदपत्रांच्या स्वयंस्वाक्षांकीत प्रतीसह उपस्थित रहावे, असे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी कळविले आहे.