जिल्हयाच्या विकासासाठी नागरिकांचे सहकार्य गरजेचे- जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

जिल्हयाच्या विकासासाठी नागरिकांचे सहकार्य गरजेचे- जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

· महाराष्ट्रदिनी मांडला जिल्हयाच्या प्रगतीचा आढावा

· आनंदाचा शिधा वाटपात राज्यात जिल्हा पहिल्या क्रमांकावर

 

भंडारा, दि. 1 : विकास ही सामूहिक प्रक्रिया असून त्यासाठी राजकीय ईच्छा शक्ती, शासकीय यंत्रणेची गतीमानता यासोबत समाजाची आणि नागरिक म्हणून त्या समूहाची देखील महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज केले. पोलीस मुख्यालय येथे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजीत मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते.

 

यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्त्तकोटी, अतिरीक्त जिल्हाधिकारी सुनील विंचनकर, पोलीस अधीक्षक लोहित मतानी, उप वनसंरक्षक राहुल गवई, निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, यासह अन्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

आनंदाचा शिधा वाटपात राज्यात जिल्हा पहिल्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्याची प्रमुख अर्थव्यवस्था ही धान पिकावर अवलंबून असली तरी पिक पद्धतीत वैवीध्य आणण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी रेशीम शेती, तुती पालन कार्यशाळा, शेतकरी उत्पादक कंपन्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी त्यांची कार्यशाळा आदी भरघोस प्रयत्न सुरू आहेत. शेतकरी व शेतीशी संबंधीत भागधारकांशी सातत्याने संवाद करून या जिल्ह्याची कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्याचा मानस असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगीतले.

 

गोसेखुर्द प्रकल्पाची एकूण सिंचन क्षमता अडीच लाख हेक्टर असून त्यामध्ये भंडारा जिल्ह्याची सिंचन क्षमता 87 हजार हेक्टर आहे. मार्च 2023 अखेर 57 हजार हेक्टरवर सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात 230 लाभार्थ्यांना कर्ज मंजुर करण्यात आले आहे. मार्च 2023 अखेरपर्यंत जिल्ह्यातील एकुण 1 लाख 70 हजार 945 कुटुंबाना जलजिवन मिशन अंतर्गत नळ जोडणी देण्यात आली आहे.

 

सामाजिक न्याय विभागातर्फे जेईई, निट या परिक्षाचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 893 टॅबचे वाटप करण्यात आले आहे. शासनाने सर्वसामान्य नागरिकांना रास्त दरात वाळू उपलब्ध करून देण्याकरता वाळूचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्वसामान्य नागरिकांना वाळू विविध शासकीय डेपो मधून उपलब्ध होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

 

सामान्य माणसाच्या दारी शासकीय सेवा पोहोचवण्यासाठी शासकीय योजनांची जत्रा हा कार्यक्रम एप्रिल ते जून महिन्यापर्यंत राबविण्यात येत आहे. विकासाचे पंचामृत असणाऱ्या शाश्वत शेती, पायाभुत सुविधांचा विकास, पर्यावरणपुरक विकास, सक्षम, कुशल रोजगारक्षम युवा आणि सर्व समाजघटकांचा विकास या पाच मुद्यांवर काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

कार्यक्रमाच्या सुरूवातीला जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत व गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत गायल्या गेले. त्यानंतर पथसंचलन करण्यात आले. पथसंचलनात भंडारा पोलीस, भंडारा शहर, महिला पोलीस, श्वान पथक यासह विविध पथकांनी पथसंचलन केले. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.