ओबीसींच्या विशाल मोर्चात तेली समाज आपली शक्ती दाखविणार

तेली समाजातील पदाधिकाऱ्यांनी केला निर्धार

चंद्रपूर/प्रतिनिधी
2019 च्या जनगणनेत ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, उच्च शिक्षणामध्ये ओबीसींना 27 टक्के आरक्षण मिळाले पाहिजे, यासह अन्य मागण्यांसाठी संविधान दिनी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता ओबीसींच्या विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये तेली समाज मोठ्या संख्येने सहभागी होत असून, आपली ताकद दाखवून देईल, असा निर्धार मातोश्री सांस्कृतिक सभागृह, ताडोबा रोड तुकूम येथे येथे पार पडलेल्या समाज पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार देवराव भांडेकर होते. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे मुख्य प्रचारक ॲडव्होकेट दत्ताजी हजारे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, राष्ट्रीय ओबीसी संघटनेचे बबनराव फंड, माजी महापौर संगीता अमृतकर, प्राध्यापक रमेश पिसे, तेली समाज महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. नामदेवराव वरभे, सूर्यभान झाडे, विजय बावणे, चंदा वैरागडे, मीनाक्षी गुजरकर, प्रा. नारायणराव येळने, विदर्भ तेली समाज महासंघाचे बल्लारपूर अध्यक्ष सतीश बावणे, तैलिक युवा एल्गार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र इटनकर, राजेश सावरकर, अशोकराव झोङे यांची उपस्थिती होती. मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते श्री संताजी जगनाडे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करण्यात आले.
बैठकीचे आयोजक तथा विदर्भ तेली समाज महासंघाचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत खनके यांनी प्रस्ताविक केले. ते म्हणाले, भारताच्या संविधानाने कलम 340 अन्वये ओबीसी प्रवर्गात येणाऱ्या सर्व जातींना संवैधानिक आरक्षण दिले आहे. ओबीसी च्या या संवैधानिक आरक्षणासाठी 26 नोव्हेंबर 2020 संविधान दिन ला सकाळी 11 वाजता निघणा-या ओबीसीच्या मोर्चामध्ये आपण सर्व समाज बंधू-भगिनी युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सामील व्हावे, असा हा संदेश समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचावा, यासाठी ही सहविचार बैठक घेण्यात येत आहे.
याप्रसंगी बोलताना एडवोकेट दत्ताजी हजारे म्हणाले, ओबीसी मोर्चात सर्व समाजाचे नेतृत्व मोठ्या प्रमाणात दिसण्याची गरज आहे. तेव्हाच आपली ताकद शासनापर्यंत कळेल. कुण्या एकट्या जातीच्या मोर्चातून प्रभाव पङणार नाही. म्हणून सर्व ओबीसी प्रवर्गातील जातींनी सामुदायिक येणे आवश्यक आहे. यावेळी उपस्थित इतर मान्यवरांनीही जातीनिहाय जनगणना आणि महत्त्व आणि त्याची गरज व्यक्त केली.
संवैधानिक आरक्षण हक्कानुसार समाज संघटन, ओबीसी जातनिहाय जनगणना, ओबीसी आरक्षण, या विषयावरही चर्चा झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण अत्यल्प असल्याने होणाऱ्या अन्यायावरही चर्चा करण्यात आली. या ओबीसी मोर्चात तेली समाजाचे प्रतिनिधित्व आणि शक्ती प्रभावी दिसावी यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले पक्षीय विचारसरणी बाजूला ठेवून एकत्रित येण्यासाठी निर्धार केलेला आहे. कार्यक्रमाचे संचालन गंगाधर कुणघाङकर यांनी केले.