गतवर्षीचे उत्पादन व चालू वर्षातील पीक परिस्थिती हवामान, क्षेत्रीय पाहणीनुसारच हरभ-याचा अंदाज

गतवर्षीचे उत्पादन व चालू वर्षातील पीक परिस्थिती

हवामान, क्षेत्रीय पाहणीनुसारच हरभ-याचा अंदाज

Ø कृषी विभागाचे स्पष्टीकरण

 

चंद्रपूर, दि. 06 : जिल्हयातील प्रमुख पिकांची उत्पादकता ठरविण्यासाठी कृषी विभागाच्या प्रचलित पध्दतीनुसार पीक कापणी प्रयोगांचे आयोजन महसुल, कृषी व जिल्हा परिषद या तीन यंत्रणांव्दारे केले जाते. गावाची निवड ही कृषी आयुक्तालयाकडून प्राप्त झालेल्या 20 टक्के टीआरए गावाच्या यादीतून जिल्हास्तरीय पीक कापणी प्रयोग प्रशिक्षण वर्गातून केली जाते.

 

चंद्रपूर जिल्हयाची मागील पाच वर्षाची प्रत्यक्ष उत्पादकता ही सन 2017-18 मध्ये 641.12 किलो/हे., 2018-19 मध्ये 778.34 किलो / हे., 2019-20 मध्ये 746.87 किलो / हे.,2020-21 मध्ये 782.88 किलो / हे., 2021-22 मध्ये 858.12 किलो / हे. इतकी आली आहे. मागील 5 वर्षाची सरासरी उत्पादकता 7 ते 8 क्विंटल प्रति हेक्टरी आहे. त्यात एकाच वर्षात अंदाजित अचानक मोठी वाढ होऊ शकत नाही. प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोगाची आकडेवारी उपलब्ध होण्यासाठी वेळ लागतो. तोपर्यंत शेतकऱ्यांची हरभरा खरेदी विक्रीची अडचण होऊ नये, म्हणून मागील वर्षी आलेले उत्पादन व यावर्षीची पीक परिस्थिती, हवामान, क्षेत्रीय पाहणीनुसार अंदाज दिला जातो.

 

निवडलेल्या गावातून प्रायोगिक पिकांकरीता पेरणी झालेल्या सर्व्हे क्रमांकामधूनच हरभरा या पिकांकरीता 10 X 10 मी. या आकारमानाचा प्लॉट रॅन्डम पध्दतीने निवड केला जातो. तसेच शासनास चालु वर्षाकरीता खरीप व रब्बी हंगामातील मुख्य पिकांचे अपेक्षित नजर अंदाजानुसार मागील 5 वर्षाच्या सरासरी आधारीत व पीक परिस्थितीनुसार अंदाजीत उत्पादकता टप्याटप्याने कळविली जाते. व अंतीम उत्पादकता ही संबंधित पिकांच्या नियोजीत सर्व पीक कापणी प्रयोगाअंती निश्चित केली जाते. ग्रामस्तरावर सरपंच यांचे अध्यक्षतेखालील समितीची याला मान्यता असते. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अधिसुचित केलेले महसुल मंडळ / तालुका या घटकस्तरावर नोंद करण्यासाठी संबंधित पीक कापणी प्रयोगाची आकडेवारी ही सीसीई ॲग्री या मोबाईल ॲपव्दारे मोक्यावर जावून जीओ टॅग फोटोसह घेतली जाते. तसेच यात पीक वाढी व कापणीच्या तसेच कापणीपश्चात काढणीपर्यंतच्या टप्प्यावर वेगवेगळ्या स्तरावर महसूल, कृषि तसेच जिल्हा परीषद विभागातील वर्ग 1 व 2 च्या अधिकाऱ्यांचे यावर पर्यवेक्षण केले जाते. यानंतर आलेल्या उत्पनाच्या आकडेवारीचे जिल्हा अधिक्षक कार्यालयामार्फत संकलन करुन सदर माहिती वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात येते.

 

सन 2022-23 मधील खरीप हंगामात झालेला पुरेसा पाऊस, जमिनीत असलेला ओलावा व हरभरा पिकाकरीता अनुकुल नैसर्गिक परिस्थिती तसेच वेळोवेळी निरीक्षित व परिक्षित केलेल्या पीक परिस्थितीनुसार चालु वर्षाकरीता सुधारीत अंदाजीत पुर्वानुमानानुसार हरभरा पिकांची अंदाजित उत्पादकता ही 1206 किलो / हेक्टर इतकी घेण्यात आली आहे. ही पद्धत गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी कळविले आहे.