राज्यस्तरीय शालेय मैदानी व कुस्ती स्पर्धांचे बल्लारपूर व मूल येथे होणार आयोजन

राज्यस्तरीय शालेय मैदानी व कुस्ती स्पर्धांचे बल्लारपूर व मूल येथे होणार आयोजन

Ø जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा परिषदेचा आढावा

 

चंद्रपूर, दि. 3 : राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धा (14 वर्षे आतील मुले/मुली) आणि राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा (19 वर्षे आतील मुले / मुली) अनुक्रमे बल्लारपूर आणि मूल येथे होणार आहे. 10 ते 12 मार्च 2023 या कालावधीत बल्लारपूर क्रीडा संकूल येथे शालेय मैदानी स्पर्धांचे तर 28 ते 30 मार्च 2023 रोजी शालेय कुस्ती स्पर्धांचे मूल येथे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्हा क्रीडा परिषदेचा आढावा घेतला.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला पालकमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. विजय इंगोले, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, सा.बा. चे उपअभियंता प्रकाश अमरशेट्टीवार, प्रशांत वसुले, मूलचे तहसीलदार डॉ. रविंद्र होळी, शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे, मूलच्या तालुका क्रीडा अधिकारी उमाकांता रंगारी , छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते राजेश नायडू आणि कुंदन नायडू उपस्थित होते.

 

दोन्ही राज्यस्तरीय स्पर्धांसाठी खेडाळूंची निवास व्यवस्था, भोजन, परिवहन, पंच, क्रीडांगण, पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आदींबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच दोन्ही राज्यस्तरीय स्पर्धांचे दर्जेदार व उत्तम आयोजन करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिका-यांनी दिल्या.