पाककला स्पर्धेत आरोग्यासाठी तृणधान्यांचा जागर माविम व कृषी विभागाच्या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद

नाचणीचा केक, ज्वारीचा चिवडा, गव्हाची खीर…

पाककला स्पर्धेत आरोग्यासाठी तृणधान्यांचा जागर

माविम व कृषी विभागाच्या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद

भंडारा, दि. 21 : आज सामाजिक न्याय विभागाच्या सभागृहात जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व महिला आर्थिक विकास महामंडळ भंडारा यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित महिला मेळावा व पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पन्नासहून अधिक महिला बचतगटांच्या सदस्यांनी या पाककला स्पर्धेत सहभाग घेतला.

 

नाचणीचा केक, ज्वारीचा चिवडा, गव्हाची खीर, राजगीरा लाडू व गुलाबजाम, लाखोळी डाळीचे वडे, ज्वारी व गव्हाचे आयते, भगर ईडली, नाचणी मोदक व शंकरपाळे, मका थालीपीठ, चकल्या यासह अन्य आरोग्यदायी पाककलांची पौष्टिकतेच्या माहितीसह कलात्मक पध्दतीने मांडणी करण्यात आली होती.

 

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक अर्चना कडू, माविमचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप काठोळे, आहारतज्ञ मीरा पिंगळे-खडक्कार, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे उपस्थित होते.

 

सर्वप्रथम जिल्हाधिकाऱ्यांनी पाककला स्टॉलची पाहणी केली. तृण किंवा भरडधान्य आपल्या आहारात होती त्यांचे प्रमाण वाढविण्याचे व पुन्हा प्राचीन आहार परंपरा अंगिकारण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

मिलेट रेस्टॉरंट सुरू करणार

 

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त भंडारा जिल्ह्यात लवकरच मिलेट रेस्टॉरंट सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे माविमचे व्यवस्थापक प्रदीप काठोडे यांनी सांगितले. महिलांनी त्यांच्या आरोग्यासाठी महत्वाचा घटक असणाऱ्या हिमोग्लोबीनची पातळी योग्य ठेवण्यासाठी घरातून कामावर निघतांना गुळ-शेंगदाणे-फुटाणे याची पुरचुंडी पर्समध्ये टाकूनच निघावे, असेही त्यांनी सांगितले. त्याअनुषंगाने आपणास विनंती की “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023” अंतर्गत पाककला स्पर्धेला उपस्थित राहावे.

 

ज्वारी,बाजरीचे पेराक्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागाचा प्रयत्न

 

भंडारा जिल्ह्यात भात हे मुख्य अन्न असल्याने अन्य तृणधान्याचे पिक शेतकऱ्यांनी घ्यावे, यासाठी ज्वारी, बाजरीचे पेराक्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागाचा प्रयत्न असेल, असे श्रीमती अर्चना कडू यांनी सांगितले. तसेच यावेळी उपस्थित महिला मेळाव्याला त्यांनी मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्त्या प्रिया शहारे, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ यांनी यावेळेस विचार मांडले.

 

आहारतज्ञ मिरा पिंगळे-खडक्कार यांनी यावेळी तृणधान्यांचे आहारातील महत्व सांगितले. समतोल आहारासाठी त्यांनी सादरीकरणाव्दारे विस्तृत माहिती दिली. तसेच तृणधान्यांचा आहारात वापर केल्यानंतर योग्य पचनासाठी किमान 4 लिटर पाणी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. वयानुसार समतोल आहारात प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्व यांचे योग्य प्रमाण असले पाहिजे. ईट लोकल हा आरोग्य मंत्र त्यांनी सांगितला. महिलांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी यावेळी उत्तरे दिली.

 

विजेत्यांचा सत्कार

 

पाककला स्पर्धेत अलका गजभिये, शहापूर यांना प्रथम, प्रिया भिवगडे भंडारा यांना व्दितीय तर रूपाली रेहपाडे भिलेवाडा यांना तृतीय क्रमांक मिळाला. रोख बक्षीस, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छासहीत विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. तर प्रोत्साहनपर पुरस्कारामध्ये विजेता गेडाम, जांभळी व मंजुषा आगासे पांजरी यांनी बाजी मारली.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला राज्यगीताचे गायन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषी अधिकारी वृषाली देशमुख यांनी तर आभार कृषी अधिकारी जिल्हा सल्लागार अजय आटे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला 500 हून अधिक महिलांचा सहभाग होता.