५३८ दुकानदारांनी स्वीकारला ” विकल्प थैला “चा पर्याय मनपाद्वारे १५४०० विकल्प थैलाचे वितरण

५३८ दुकानदारांनी स्वीकारला ” विकल्प थैला “चा पर्याय

मनपाद्वारे १५४०० विकल्प थैलाचे वितरण

 

चंद्रपूर १४ फेब्रुवारी – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत प्लास्टीक पिशवीला विकल्प किंवा पर्याय म्हणुन विकल्प थैला उपलब्ध करून दिला आहे. आतापर्यंत ५३८ दुकानदारांनी विकल्प थैलाच्या वापरास सुरवात केली असुन मनपाद्वारे १५४०० विकल्प थैलाचे वितरण करण्यात आले आहे.

बाजारात कोणत्याही छोट्या मोठ्या वस्तू खरेदी केल्या की आपसूकच दुकानदार प्लास्टिकची पिशवी देतो किंवा ती आवर्जून मागितली जाते. परिणामी मोठ्या प्रमाणात पर्यावरणाला हानी पोहचत आहे.मनपातर्फे शहरात नियमित स्वच्छता करण्यात येते. मात्र सफाई दरम्यान नालीत, गटारात मिळणाऱ्या प्लास्टिक पन्नीचे प्रमाण फार मोठे आहे. प्लास्टीक बंदीची अंमलबजावणीसाठी प्लास्टिक कॅरी बॅग वापरतांना आढळल्यास ५००० रुपये दंडाची देखील तरतुद आहे.

विकल्प थैला नोंदणी केलेल्या दुकानातुन माफक शुल्क देऊन खरेदी करता येत आहे. छोटी थैली १० रुपये तर मोठी थैली १५ रुपयांना मिळत असुन काम पुर्ण झाल्यावर सदर कापडी पिशवी दुकानदारास परत करण्याचाही पर्याय नागरीकांना उपलब्ध आहे. महीला बचत गटाद्वारे बनविल्या जाणाऱ्या या कापडी पिशवीवर QR कोड उपलब्ध असुन या QR कोडला मोबाईलने स्कॅन करताच कापडी पिशवी मिळण्याच्या ठिकाणांची माहीती मिळते.

त्याचप्रमाणे इंटरनेट वर vikalpthaila.com या संकेतस्थळावर ( वेबसाईट ) वर जाऊन क्लिक केल्यास किंवा कापडी पिशवीवरील QR कोडला मोबाईलने स्कॅन केल्यास ज्या परीसरातील दुकानातुन विकल्प थैला घ्यायचा असेल तो परीसर निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. दुकानाचा पर्याय निवडतात दुकानासंबंधीत आवश्यक ती माहीती जसे दुकानाचे नाव, गुगल लोकेशन, मोबाईल क्रमांक इत्यादी पाहता येते.

दुकानदारांनी या मोहीमेत सहभागी होण्यास रफीक शेख यांच्याशी ९४२३४१६७२६ या क्रमांकावर संपर्क साधावा. सर्व दुकानदार व व्यापारी यानी विकल्प थैला दुकान म्हणून नोंदणी करुण घ्यावी आणी विकल्प थैला ग्राहकांना उपलब्ध करुन द्यावा प्लास्टिक कॅरी बॅगचा वापर बंद करण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.

राज्यात प्लास्टीक बंदीची अंमलबजावणी सुरू असून, पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या कापडी पिशवी प्लास्टिक कॅरी बॅगला सक्षम पर्याय ठरणार आहेत. आपल्या शहरातील व्यापाऱ्यांनी जर कापडी पिशवीचाच वापर करण्याचा निर्धार केला तर ही कापडी पिशवी प्रत्येक घरात पर्यावरण रक्षणाचा संदेश उत्तमरित्या पोहोचवेल – आयुक्त विपीन पालीवाल