बल्लारपूर मतदारसंघासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास निधीअंतर्गत ४ कोटी रुपये मंजूर

बल्लारपूर मतदारसंघासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास निधीअंतर्गत ४ कोटी रुपये मंजूर

प्रत्येक गावात मूलभूत सोयी देण्याचा प्रयत्न करणार  : ना सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. 11 : बल्लारपूर मतदार संघातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास आणि क्षेत्रातील विविध कामासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंर्तगत शासनाने ४ कोटी रुपये निधी मंजूर केले आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत सामाजिक न्याय विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

 

चंद्रपूर य़ा आदिवासी बहुल जिल्ह्यातील बल्लारपूर मतदार संघातील प्रत्येक गाव आणि वस्ती मूलभूत सोयी सुविधांनी परिपूर्ण असावे, यासाठी मी कटिबद्ध आहे. लोकप्रतिनिधी म्हणून ही जबाबदारी पार पाडत असताना या भागातील प्रत्येक घटकांपर्यंत विकासाच्या योजना पोहोचविण्याचा माझा प्रयत्न असेल असे श्री मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

 

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या कामांमध्ये प्रामुख्याने पोंभूर्णा तालुक्यातील फुटाणा मोसाका येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन, घोसरी, घाटकूळ, चकठाना, सातारा, येरगाव, हत्तिबोडी येथील बंदिस्त नाली बांधकाम तसेच वेळवा माल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील परिसरात पेवर ब्लॉक व मौजा उमरी पोतदार येथील पंचशील चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.

 

बल्लारपूर तालुक्यातील मानोरा येथील नाली बांधकामासह कोटीमत्ता, पळसगाव, कोठारी, मौजे लावारी, नांदगाव पोडे, दहेलि येथे रस्ते बांधकाम या निधीतून करण्यात येणार आहे. मूल तालुक्यातील गावांना देखील या निधीतून विकासाचा लाभ मिळणार असून यामध्ये नवेगाव, जुनसुर्ला या गावात रस्त्यांचे बांधकाम, गोवर्धन येथे बंदिस्त नाली बांधकाम आणि चितेगाव येथील चौकाचे सौंदर्यीकरण इत्यादी कामांचा समावेश आहे.