संघटन कौशल्याच्या बळावर अकोल्यात बसपा किंगमेकर ठरेल-अँड.संदीप ताजने

संघटन कौशल्याच्या बळावर अकोल्यात बसपा किंगमेकर ठरेल-अँड.संदीप ताजने

आता ‘शासनकर्ते’ व्हा-प्रमोद रैना साहेब

अकोला, ९ सप्टेंबर २०२२

संघटन कौशल्य, मान्यवर कांशीराम जी यांची राजकीय विचारधारा आणि माननीय बहन सुश्री मायावती जी यांच्या नेतृत्वावर असलेल्या खंबीर विश्वासाच्या बळावर अकोला जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बहुजन समाज पार्टी ‘किंगमेकर’च्या भूमिकेत दिसेल, असा विश्वास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.अँड.संदीप ताजने साहेबांनी आज,शुक्रवारी व्यक्त केला. अकोला येथे ‘होवू शकत है’ राज्यस्तरीय ‘शासक बनो’ कार्यकर्ता प्रशिक्षण अभियान निमित्त आयोजित कार्यक्रमातून कॅडरला संबोधित करतांना त्यांनी पक्ष संघटन, पक्ष विस्तार आणि वैचारिक भूमिका मांडत निवडणुकीसाठी सर्वस्वी तयार राहण्याचे आवाहन केले. यावेळी प्रदेश प्रभारी मा.प्रमोद रैना साहेब, प्रदेश प्रभारी मा.सुनील डोंगरे प्रामुख्याने विचारपीठावर उपस्थित होते.

बीएसपी अकोल्यातही स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. जिल्ह्यात पार्टीचा जनाधार वृद्धिंगत झाला आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर समाजाला तयार करायचे आहे. जाती आणि वर्गव्यवस्थेला हद्दपार करण्याचा वसा पक्षाने घेतला आहे. याच उद्दिष्ट प्राप्तीसाठी आगामी निवडणुकीत मतदारांची पहिली पसंत बसपा असेल, असा विश्वास यावेळी अँड.ताजने साहेबांनी व्यक्त केला. जिल्ह्यासह राज्यातील बळीराजाला ‘अन्नदाता’ आणि ‘ऊर्जादाता’ बनवण्यासाठी पक्षाचा प्रत्येक कॅडर मेहनत घेत आहे. पक्षासाठी समाजकार्याला वाहून घेणाऱ्या प्रत्येक कॅडरच्या मेहनतीला सलाम करीत याच प्रेम आणि विश्वासावर पक्ष भविष्यात ‘सर्वजन हिताय,सर्वजन सुखाय’ समाजव्यवस्था उभी करण्यात यशस्वी होईल,अशी भावना अँड.ताजने यांनी व्यक्त केली.

शोषित,पीडित,उपेक्षितांच्या उद्धारासाठीच पक्षाची स्थापना झाली आहे.याच लक्ष प्राप्तीसाठी पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि हितचिंतक कार्यरत आहेत. राज्यात आतापर्यंत सत्ता उपभोगणाऱ्या काँगेस , राष्ट्रवादी काँगेस , भाजप, शिवसेनाने शोषितांच्या प्रश्नांना वाचा फोडल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे ‘समाजकारणासाठी सत्ताकारण’ या सूत्रानुसार ‘स्थानिक स्वराज्य संस्था’ ते ‘दिल्ली’ पर्यंतच्या प्रत्येक सभागृहात माननीय बहन.सुश्री.मायावतीजींच्या नेतृत्वात पक्षाची ताकद पोहचवायची असल्याचे,अँड.ताजने म्हणाले.

कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश सचिव विजय येलकर, अकोला जिल्हाध्यक्ष रमेश इंगळे, जिल्हाप्रभारी प्रा.व्ही.आर.कांबळे, प्रभारी डॉ.धनंजय नालट, उपाध्यक्ष अँड.चंद्रकांत वानखेडे, बाळासाहेब ढोके, महासचिव संघपाल सिरसाट, सचिव विरेंद्र सिरसाट, जिल्हा संघटक प्रविण गोपनारायण, कोषाध्यक्ष वामनराव सरकटे तसेच सर्व विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक प्रामुख्याने उपस्थित होते.

‘शासक का शोषण’ नहीं होता-मा.प्रमोद रैना साहेब

‘‘जिसका ‘शासन’ होता है उसका ‘शोषण’ नही होता…’ असे ठणकावून सांगणारे विचार आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मांडले होते. त्यामुळे कष्टकरी, मजूर, शोषित, दलित, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी बहुजनांना शासक होणे आवश्यक असल्याची बाब प्रकर्षाने जाणवते, असे मत प्रदेश प्रभारी मा.प्रमोद रैना साहेबांनी व्यक्त केले. जोपर्यंत आपण शासक होणार नाही तोपर्यंत शोषण सुरूच राहील. त्यामुळे महामानव डॉ.बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ‘जा आणि तुमच्या घरांच्या भिंतीवर मला शासक जमात व्हायचं आहे’ असे लिहून ठेवा, असे आवाहन मा.रैना साहेबांनी उपस्थितांना केले.राज्यात पक्षाने आता शासक होण्याच्या दिशेने तयारी सुरू केली आहे आणि ‘होवू शकत है’ राज्यस्तरीय ‘शासक बनो’ कार्यकर्ता प्रशिक्षण अभियानांच्या कार्यक्रमांना राज्यभरात मिळणारे प्रेम त्याची पोहच पावती असल्याचे मा.रैना साहेब म्हणाले.