सांस्कृतिक कार्य विभागातर्फे कलावंतांसाठी डिजिटल व्यासपीठ तयार करणार- मंत्री सुधीर मुनगंटीवार

सांस्कृतिक कार्य विभागातर्फे कलावंतांसाठी डिजिटल व्यासपीठ तयार करणार- मंत्री सुधीर मुनगंटीवार

 

मुंबई, दि. 31 : राज्यातील विविध भागात अनेक कलाकार आपली कला वेगवेगळया स्वरुपात प्रेक्षकांसमोर सादर करत असतात. या सर्व कलाकारांना कला सादरीकरणासाठी व्यासपीठ असावे म्हणून सांस्कृतिक कार्य विभाग कलावंतांसाठी डिजिटल व्यासपीठ तयार करणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

 

चित्रकार मिलिंद लिंबेकर यांचे “द वॉन्डरिंग शॅडो” या चित्रप्रदर्शनाचे जहांगीर आर्ट गॅलरी येथे आयोजन करण्यात आले आहे. 31 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान सुरु राहणाऱ्या या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन आज सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चित्रकार मिलिंद लिंबेकर यांच्यासह आशा महाकाले, महेश सरमळकर, चित्रकार विजय बोधनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, विदर्भातील चित्रकाराच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळणे हा मी माझा बहुमान समजतो. आगामी काळात मिलिंद लिंबेकर यांची कला फक्त विदर्भात, मुंबईत न पोहोचवता भारतभर पोहोचवेल, अशी खात्री आहे.

 

भारतामध्ये कला, संस्कृती यांची विविधता आहे. महाराष्ट्रात कला, साहित्य, संस्कृती यामध्ये विविधता आहेच. आज राज्यात प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना आपले हक्काचे व्यासपीठ मिळावे, आपली कला सादर करण्याची संधी मिळावी यासाठी एक डिजिटल व्यासपीठ तयार करण्यात येत आहे. या डिजिटल व्यासपीठावर महाराष्ट्रातील प्रत्येक कलाकाराला आपली कला प्रदर्शित करण्याची संधी मिळणार असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

 

श्री. मिलिंद यांची आतापर्यंत पाच एकल चित्र प्रदर्शनी झाली आहेत. त्याचबरोबर देशभरातील अनेक चित्रप्रदर्शनात सहभाग नोंदवला आहे. “द वॉन्डरिंग शॅडो” या चित्रप्रदर्शनात त्यांनी मानवी आणि प्राण्यांच्या स्वरुपात मोठ्या खुबीने नाट्यमयता आणली आहे. या चित्रप्रदर्शनात बहुतांश चित्रे ही ऍक्रेलिक माध्यमातील आहेत.