चंद्रपूर शहरात सिंगल युज प्लास्टिक जप्त; मनपाने केली दंडात्मक कारवाई

चंद्रपूर शहरात सिंगल युज प्लास्टिक जप्त; मनपाने केली दंडात्मक कारवाई

चंद्रपूर, ता. १० : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीत ३० सप्टेंबर २०२१ पासून सिंगल युज प्लास्टिक वस्तूंना प्रतिबंधित करण्यासाठी ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅगवर बंदी घालण्यात आली आहे. वारंवार सूचना देऊनही त्यांचा वापर करण्याऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करीत सिंगल युज प्लास्टिक जप्त करण्यात आली.

मनपाचे आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्या सूचनेवरून वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अमोल शेळके यांच्या मार्गदर्शनात झोनचे मुख्य स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक तसेच सुरक्षा रक्षक व कर्मचारी यांच्या पथकाने संयुक्त मोहीम राबवून प्लास्टिक, थर्मोकॉलसारख्या वस्तूंचे उत्पादन, वापर, विक्री, हाताळणी व साठवणूक करताना आढळून आलेल्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली. शिवाजी नगर, तुकूम, एकोरी वॉर्ड, ताडोबा रोड हनुमान नगर, जयराजनगर, पोलीस क्वार्टर परिसर, निर्माण नगर या भागात मुख्य मार्गावरील मिठाई विक्रेते, भाजी फळ विक्रेते, रांगोळी आणि किरकोळ साहित्य विक्रेते यांची तपासणी करण्यात आली. यात सिंगल युज प्लास्टिक जप्त करण्यात आली. या प्रकरणी त्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सुरुवातीला प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणारे भाजीविक्रेते, फळविक्रेते, विविध खाद्यपदार्थांचे स्टॉलधारक, किराणा दुकानदार यांना समज देण्यात येत आहे. मनपाने दिवाळीपूर्वी प्लास्टिक वापराच्या विरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे अनेक दुकानदारांनी प्लास्टिक पिशवी वापरणे बंद केले. परंतु, काही भाजी फळविक्रेते, किराणा दुकान, मेडिकल आदी ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा वापर पुन्हा सुरू झाल्याने बंदीची मोहीम पुन्हा सुरु झाली आहे. प्लास्टिक जप्ती कार्यवाही करुन प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.