वित्त विभागाच्या नागपूर विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा शुभारंभ Ø सैनिक स्कूल, चंद्रपूर येथे आयोजन

वित्त विभागाच्या नागपूर विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा शुभारंभ

 

Ø सैनिक स्कूल, चंद्रपूर येथे आयोजन

 

चंद्रपूर, दि. 7 : संचालनालय, लेखा व कोषागारे कर्मचारी कल्याण समिती द्वारे आयोजित वित्त विभागाच्या नागपूर विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा शुभारंभ आज (दि.7) सैनिक स्कूल, चंद्रपूर येथे करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नागपूर येथील लेखा व कोषागार विभागाच्या सहसंचालक सुवर्णा पांडे, स्थानिक निधी लेखा विभागाच्या सहसंचालक मोना ठाकूर, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, जिल्हा कोषागार अधिकारी प्रफुल वडेट्टीवार आदी उपस्थित होते.

 

मान्यवरांच्या हस्ते मशाल प्रज्वलन व आकाशात तिरंगी फुगे सोडून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच 100 मीटर (पुरुष / महिला ) धावण्याच्या स्पर्धेने सुरवात झाली. उद्घाटनपर कार्यक्रमात खेळाडूंना शुभेच्छा देतांना सहसंचालक पांडे म्हणाल्या, येथील प्रशस्त आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सैनिक स्कूलमध्ये चंद्रपूर कोषागार कार्यालयाच्या टीमने विभागीय स्पर्धांचे अतिशय सुंदर आयोजन केले आहे. त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन. तीन दिवसीय या स्पर्धेत वित्त विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. दैनंदिन कामाव्यतिरिक्त शारीरिक व्यायाम खेळाच्या माध्यमातून होत असून सर्व सहभागी खेळाडू अधिकारी व कर्मचा-यांनी या स्पर्धांचा आनंद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना जिल्हा कोषागार अधिकारी श्री. वडेट्टीवार म्हणाले, चंद्रपूर कार्यालयाला या स्पर्धांच्या आयोजनाचा मान मिळाला, ही आमच्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. लेखा कोषागार कार्यालय दैनंदिन कामात निव्वल आकड्यांसोबत खेळतो. मात्र या स्पर्धांच्या आयोजनाने अधिकारी व कर्मचा-यांना प्रत्यक्ष मैदानात खेळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सर्वांसाठी ही एक पर्वणीच आहे, असे त्यांनी सांगितले.

 

कार्यक्रमाचे संचालन जयदीप साधनकर आणि आश्विनी कुलकर्णी यांनी केले. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी अशोक मातकर (जि.प. चंद्रपूर), मनोहर बागडे (मनपा, चंद्रपूर), जनार्दन खोटरे (गोंदिया), उमेश गायकवाड (गडचिरोली), श्री. सोनी (भंडारा), उपमुख्य लेखाधिकारी धर्मराव पेंदाम, लेखाधिकारी राजरत्न बेले, उपलेखापाल अजय राठोड, श्री. बोकडे, श्रीमती नागर, श्री. हिरुळकर आदी उपस्थित होते.

 

तीन दिवसीय या स्पर्धेत क्रिकेट, धावणे, कॅरम, बॅटमिंटन, खो-खो, व्हॉलीबॉल, थ्रो-बॉल, स्विमिंग, गोळाफेक, थाळीफेक अशा एकूण 17 क्रीडा प्रकारांचा समावेश असून चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा येथील खेळाडू यात सहभागी झाले आहेत.