सिंदेवाही तालुक्यातील महिलांना मिळणार बांबू पासून रोजगाराच्या संधी

सिंदेवाही तालुक्यातील महिलांना मिळणार बांबू पासून रोजगाराच्या संधी

लोनवाही येथे बांबु हस्तकला प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

चंद्रपूर दि. 3 : बांबू वस्तू उत्पादनाच्या क्षेत्रात महिलांचे कौशल्य विकसित करून त्यांतून रोजगार निर्मिती द्वार महिलांना आत्मनिर्भर बनण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. हाच उद्देश समोर ठेवून चिचपल्ली बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांनी संयुक्तरित्या सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही येथे सामुहिक उपयोगिता केंद्रात महिलांसाठी बांबु हस्तकला प्रशिक्षण सुरू केले आहे.

प्रशिक्षणाच्या पहिल्या तुकडीचे उद्घाटन दिक्षा लोकसंचालित साधन केंद्र, तळोधी च्या अध्यक्ष शीतल बारसागडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्राचे संचालक अविनाश कुमार, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी नरेश उगेमुगे, बांबू संशोधन केंद्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए. डी. मल्लेलवार, दिशा लोकसंचलित साधन केंद्राचे पदाधिकारी कर्मचारी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र येथील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

या केंद्राच्या माध्यमातून महिलांचे बांबू वस्तू निर्मितीत कौशल्य विकसित करून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे व त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून आत्मनिर्भर करणे या उद्देशाने दोन्ही विभागात सामंजस्य करार करण्यात आला. सिंदेवाही तालुकाच्या ग्रामीण भागातील सुमारे 200 महिलांना या केंद्रातून विविध टप्यात बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून यापूर्वीच जिल्हाच्या विविध सहा ठिकाणी दोन्ही विभागाच्या समन्वयातून लोकसंचलित साधन केंद्राच्या माध्यमातून सामुहिक उपयोगिता केंद्राचे संचालन यशस्वीरित्या करण्यात येत आहे.