चला जाणुया नदीला अभियानांतर्गत नद्यांचे आराखडे तयार होणार…/ जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी तथा समिती अध्यक्ष संजय मीणा यांच्या सूचना

चला जाणुया नदीला अभियानांतर्गत नद्यांचे आराखडे तयार होणार…

जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी तथा समिती अध्यक्ष संजय मीणा यांच्या सूचना

गडचिरोली, दि.01* : राज्यासह जिल्हयात सुरू असलेल्या चला जाणुया नदीला अभियानांतर्गत गडचिरोलीतील खोब्रागडी, कठाणी व पोटफोडी नदीची माहिती एकत्रित करून त्यावरती एक आराखडा तयार करण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी याबाबत समिती सदस्य विभागांना सूचना केल्या आहेत. या नदी संवाद अभियानात जनसामान्यांना नदीसाक्षर करण्यात येणार आहे. त्यांच्या मदतीने माहितीचे एकत्रिकरण करून प्रचार व प्रसार या अभियानांतर्गत सुरू आहे. राज्यात आता 1 ते 31 डिसेंबर पर्यंत अभियानाचा दुसरा टप्पा राबविण्यात येत आहे. या अभियानात नद्यांवरील अतिक्रमण, शोषण व प्रदुषण या तीन प्रमुख कारणांचा अभ्यास करून त्याचा परिणाम अभ्यासला जाणार आहे. या बैठकीला समिती सदस्य सचिव कार्यालयाचे प्रमुख तथा मुख्य जिल्हा वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर, पद्माकर पाटील अधीक्षक अभियंता चंद्रपूर पाटबंधारे प्रकल्प मंडळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, श्री इंगोले जिल्हा जलसंधारण अधिकारी, उपअभियंता पाटबंधारे विभाग गणेश परदेशी तसेच तीनही नदीसाठी निवडण्यात आलेले समन्वयक उपस्थित होते.

 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त चला जाणुया नदीला या अभियानांतर्गत नदी संवाद यात्रेची सुरूवात 2 ऑक्टोबर पासून राज्यात सुरू आहे. 15 ऑक्टोबर रोजी जिल्हयात तीनही नद्यांच्या काठी जल पुजन व संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. आता पुढिल टप्प्यात गावागावात जनजागृती करून लोकांना नदीसाक्षर करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन समन्वयक करतील. तसेच नदींबाबतची माहितीही एकत्रित करून ती जिल्हास्तरावर सादर केली जाणार आहे. 26 जानेवारी 2023 रोजी पर्यंत या अभियानाची मुदत आहे. स्थानिक पातळीवरती नदीच्या समस्या आणि त्यावरील संभाव्य उपाय याबाबत उपक्रम विभिन्न घटकांपर्यंत शालेय विद्यार्थ्यांमार्फत तसेच लोकसहभागातून समन्वयकांद्वारे राबविण्यात यावेत याबबतच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

 

गडचिरोली जिल्हयात चला जाणूया नदीला या अभियानासाठी खोब्रागडी नदीकरीता समन्वयक म्हणून सतिश गोगुलवार व केशव गुर्नुळे काम पाहणार आहेत. तसेच कठाणी नदीसाठी मनोहर हेपट व उमेश माहारे काम पाहतील. पोहार पोटफोडी नदीसाठी समन्वयक म्हणून प्रकाश अर्जनवार व प्रो. दिपक ठाकरे काम पाहणार आहेत.