भंडारा : किटकजन्य आजार नियंत्रण लोकचळवळ व्हावी -जिल्हाधिकारी संदीप कदम

किटकजन्य आजार नियंत्रण लोकचळवळ व्हावी -जिल्हाधिकारी संदीप कदम

भंडारा, दि.2: जून ते सप्टेंबर हा कालावधी डेंग्यू, चिकनगुणिया, हिवताप व झिका आजाराकरिता संक्रमण कालावधी असतो. किटकजन्य आजार प्रतिरोध जनजागरण मोहिमेत स्थानिक स्वराज्य संस्था, लोक प्रतिनिधी, ग्रामस्थ यांचा सक्रीय सहभाग अत्यंत मोलाचा आहे. जनतेत जागृती निर्माण व्हावी व त्यांचा सक्रीय सहभाग प्राप्त झाला तरच डेंग्यू, चिकनगुणिया, हिवताप व झिका यासारख्या दृतगतीने पसरणाऱ्या रोगांवर प्रतिबंध घालता येईल. किटकजन्य आजार नियंत्रण लोकचळवळ व्हावी. याकरिता सर्वांचे मोलाचे सहकार्य अपेक्षित आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले.

 जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित किटकजन्य आजार नियंत्रण बैठकीत ते बोलत होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. फारुकी, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखील डोकरीमारे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. माधूरी माथुरकर, जिल्हा हिवताप अधिकारी आदीती त्याडी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांची उपस्थिती होती.

मुख्यत्वे किटकजन्य आजार हे डासांमार्फत पसरतात त्यामुळे नागरिकांनी आपल्या परिसरात व घराभोवती पाणी साचू देवू नये. डबकी बुजवावी किंवा वाहती करावी. आपल्या घरासमोरील साचलेल्या पाण्यात थोडेसे रॉकेल टाका त्यामुळे डासांच्या अळ्या कमी होतील तसेच अळी भक्षक गप्पी मासे टाकावे. पाण्याचे भांडे दर आठवड्यातून पूर्ण रिकामे करणे व घासून पुसूण स्वच्छ करावे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे. निरुपयोगी टायर, नारळाच्या करवंट्या, बादल्या इत्यादी निरुपयोगी वस्तुंची विल्हेवाट लावणे. लहान मुलांना मच्छरदाणीत झोपवावे अशा प्रकारची काळजी घेतल्यास डास उत्पादकतेला आळा बसून रोगांपासून दूर राहता येते. अशी माहिती यावेळी बैठकीत देण्यात आली.

हिवताप रोगाचा प्रसार ॲनाफेलिस डासाची मादी चावल्यामुळे होतो. यामध्ये थंडी वाजून ताप येणे. ताप सततचा असू शकतो. ताप आल्यांनतर डोके दुखते बऱ्याच वेळा उलट्या होतात. यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ताप आल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात, ग्रामीण रुग्णालय किंवा घरी येणारे आरोग्य सेवकांकडून किंवा गावातील आशा वर्कर कडून रक्त तपासून घ्यावे. कोणताही ताप हिवताप असू शकतो म्हणून खबरदारी घेणे गरजेचे आहे.

डेंग्यू ताप विषाणूमुळे होतो. डेंग्यू तापाचा प्रसार रोगी व्यक्तीपासून निरोगी व्यक्तीला एडीसी इजीप्ती डासामुळे होतो. हा डास दिवसा चावा घेतो. या डासाची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होते. डेंग्यू तापाची लक्षणे एकाएकी तीव्र ताप येणे, अंगावर पुरळ येणे, ताप कमी जास्त होणे. यावर प्रतिबंधात्मक उपाय तापाची साथ असल्यास वैद्यकीय अधिकारी यांना तात्काळ कळवावे व उपचार घ्यावा.

चिकणगुणिया हा आजार व्यक्तीला एडीसी इजीप्ती डासामुळे होतो. या आजारामध्ये रुग्णाला तीव्र ताप येतो. तीव्र डोकेदुखी, सांधेदुखी, अशक्तपणा व भुक मंदावणे, कमरे पासून पायात वाक येऊन सांधे दुखी व रुग्णाला उभे राहण्यास कठीण होणे. डोळ्यांमध्ये लालसरपणा येतो ही लक्षणे असतात. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जलद ताप सर्वेक्षण करावे व हिवताप नाही याची खात्री प्रयोगशाळेतून करणे व त्यावर उपचार घ्यावा.