नियोजित तारखांप्रमाणेच आधारभूत केंद्र सुरू होणे आवश्यक  – वनमंत्री मुनगंटीवार Ø धान खरेदी संदर्भात अभ्यासगट स्थापन करणार – अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण

नियोजित तारखांप्रमाणेच आधारभूत केंद्र सुरू होणे आवश्यक  – वनमंत्री मुनगंटीवार

Ø धान खरेदी संदर्भात अभ्यासगट स्थापन करणार – अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण

 

मुंबई / चंद्रपूर, दि. 23 : खरीप हंगामातील धान खरेदी 1 ऑक्टोबर रोजी आणि रबी हंगामातील धान खरेदी 1 मे रोजी सुरू करण्याचे शासकीय धोरण आहे. त्यामुळे नियोजित तारखांप्रमाणेच आधारभूत केंद्र सुरू होणे आवश्यक असल्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच धान खरेदी अंतर्गत शेतकऱ्यांच्या अडचणीस सोडविण्यासाठी एक अभ्यासगट स्थापन करण्यात येईल, असे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले.

गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्हयातील आधारभूत धान खरेदी अंतर्गत उद्भवणाऱ्या विविध अडचणी निकाली काढण्यासंदर्भात श्री. मुनगंटीवार आणि श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला खासदार सुनील मेंढे, आमदार सर्वश्री विजय रहांगडाले, साहसराम कोरोटे, सुभाष धोटे, सुधा तेलंग, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव विजय वाघमारे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासह गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्हयाचे जिल्हाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार म्हणाले की, जिल्ह्यातील आधारभूत केंद्रांवर बहुप्रतीक्षित असलेली धानाची खरेदी अखेरीस सुरू झाली असली तरी वेग मंद आहे. मंजुरी मिळालेल्या काही केंद्रावरच प्रत्यक्षात खरेदी सुरू आहे. याबाबतची सर्व माहिती पणन विभागाने एकत्र करावी. धान उत्पादक शेतकऱ्यांना धान आधारभूत केंद्रांवर आपले धान विकण्यासाठी दरवर्षी मन:स्ताप सहन करावा लागत असल्याने ही प्रक्रिया सरळ, सुलभ आणि सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. तसेच येत्या 15 दिवसांत धान खरेदी संदर्भात एक स्वतंत्र बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

धान खरेदी प्रक्रिया नियोजित वेळापत्रकानुसार होणे आवश्यक आहे. तसेच यावर्षी धान खरेदी संदर्भातील शासन निर्णय उशिरा निर्गमित झाल्याने शेतकऱ्यांची नोंदणी होण्यास विलंब होतो. यानंतर हे असे होणार नाही, यासाठी एक एसओपी तयार करण्यात यावी. गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली यांच्यापेक्षा चंद्रपूर येथे धान खरेदी कमी झाली आहे, याचे नेमके कारण काय आहे, हे तपासून घ्यावे, अशा सूचना श्री. मुनगंटीवार यांनी संबंधित जिल्हाधिका-यांना दिल्या.

धान खरेदीपासून ते धान उचलणे हा काळ दोन महिन्यांच्या वर नसावा. तसेच हे काम वेळेत होईल यासाठी एक कार्यपध्दती तयार करण्यात यावी. पणन विभागाकडून आधारभूत केंद्रांना मंजुरी दिली असली तरी त्या केंद्रांवर बारदाना, ईलेक्ट्रिक काटे, ओलावा तपासणारी मशीन आदी साहित्यांचा पुरवठा करण्यास विलंब होतो. हा विलंब नेमका कशामुळे होतो आणि होत असल्यास याची कारणे शोधून त्यावर तत्काळ उपाय करावे, असे निर्देश अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले.

पणन विभागाला यापूर्वीच धान खरेदी आणि भरडाई बाबतचे निर्देश देण्यात आल्याने पणन विभागाने याबाबत त्वरीत अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. धान खरेदीकरिता ऑनलाईन आधार आँथटिकेशन आणि लाईव्ह फोटो सिस्टीम तयार करणे, नोंदणीकृत शेतकऱ्यांना मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन नोंदणी करणे तसेच वन हक्क जमिनीवरील धान खरेदी करण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांनी प्रमाणित करून दिल्याप्रमाणे खरेदी करणे गरजेचे असल्याचेही श्री. चव्हाण यावेळी म्हणाले.