सामाजिक न्याय विभागामार्फत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

सामाजिक न्याय विभागामार्फत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 

चंद्रपूर, दि. 14: सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयात सामाजिक न्याय दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवंत पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यालयाचे अधिनस्त शासकीय निवासी शाळा, शासकीय वस्तीगृह व विजाभज आश्रमशाळा येथील इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभ प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

 

कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार प्राप्त व्ही. डी. मेश्राम, समाजकार्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य नरेंद्र टिकले, प्राध्यापिका जयश्री कापसे आदीची उपस्थिती होती.

 

श्री. वाकुलकर म्हणाले, शिवाजी महाराजांचा वारसा चालविणारे राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाचे एक नवीन ओळख त्याकाळात निर्माण करून दिली. जाती-धर्म भेद निर्मूलनासाठी त्यांनी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. समता, सामाजिक न्यायासाठी सर्व समाजातील मुलांना एकत्रित शिक्षण घेता यावे, यासाठी वसतीगृहाची व्यवस्था करून प्राथमिक शिक्षण हे मोफत व सक्तीचे केले होते. बहुजन घटकातील विकासाकरीता शिक्षण महत्त्वाचा पाया आहे, हे राजर्षी शाहू महाराजांनी त्यावेळी ओळखले होते, असे त्यांनी मार्गदर्शनात सांगितले.

 

 

 

जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम यांनी आंतरजातीय विवाह आपल्या संस्थानात शाहू महाराजांनी अमंलात आणला होता, तो कायदा आज 1955 ला संविधानिक रूपात अस्तित्वात आला. राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्याईने कोल्हापूरचे राधानगरी धरण कृषी क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरला आहे, असे ते म्हणाले.

 

यावेळी, राजर्षी शाहु महाराज पुरस्कार जयंती निमित्त प्रज्ञा ढोक, अंजली उंदिरवाडे, रोहन जगमन या गुणवंत विद्यार्थ्यांना तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या 6 तर 10 वी मध्ये प्राविण्य प्राप्त 13 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन बार्टीचे सचिन फुलझेले तर आभार समाजकल्याण निरीक्षक मनिषा तन्नीरवार यांनी मानले.