मुलांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने वेळीच उपाययोजना कराव्यात

मुलांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने वेळीच उपाययोजना कराव्यात

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

नागपूर,13:- नवी मुंबईत दोन विद्यार्थ्यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटना गंभीर आहेत. यावरून मुलांना किती मानसिक तणाव आहे हे लक्षात येते. वाढती स्पर्धा, अभ्यासक्रमाचे ओझे अशा कारणांनी या आत्महत्या वाढत आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.

नवी मुबंईती दोन मुलांच्या आत्महत्या झाल्याची घटना घडल्याची माहिती विधानसभेत देताना श्री. वडेट्टीवार बोलत होते.

श्री. वडेट्टीवार म्हणाले की, मुलं मानसिक तणावात शिकतात. त्यांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे शाळेच्या वेळा बदलण्यासाठी शासनाकडे विचारणा केली होती. राज्यात शाळेची वेळ सकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान आहे. यामुळे झोप पूर्ण होत नाही. मुलांमध्ये प्रचंड तणाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. मुलांचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी शाळेच्या वेळा बदलल्या पाहिजेत. अपुऱ्या झोपेमुळे मुलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मुलांचे आरोग्य, मानसिक स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी शासनाने वेळीच उपाययोजना कराव्यात.