‘ निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवा दिन ‘ साजरा पर्यावरण संवर्धनचा संदेश देणारे नृत्य, सायकल रॅली

‘ निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवा दिन ‘ साजरा पर्यावरण संवर्धनचा संदेश देणारे नृत्य, सायकल रॅली

चंद्रपूर ७ सप्टेंबर – हवाप्रदूषणाच्या दुष्परिणामांबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी आणि त्याविरोधात कृती करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे ‘निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवा’ (क्लीन एअर फॉर ब्लू स्काय) दिन आज साजरा केला गेला.

संयुक्त राष्ट्राव्दारे ७ सप्टेंबर रोजी इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एअर फॉर ब्ल्यू स्काय दिवस साजरा करण्याचे जाहिर करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धन आणि वायु प्रदुषण कमी करण्याच्या दृष्टीने हे एक महत्वाचे पाऊल आहे. चंद्रपूर शहरात वायु प्रदुषणासंदर्भात जनजागृती मोहिम यानिमित्ताने राबविण्यात आली. याप्रसंगी सहायक आयुक्त विद्या पाटील, मुख्य लेखाधिकारी मनोहर बागडे, उपअभियंता विजय बोरीकर, डॉ. अमोल शेळके,नागेश नित उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत पर्यावरणा संवर्धनचा संदेश देणारे आकर्षक नृत्य नटराज कत्थक नृत्य कला मंदीरच्या विद्यार्थ्यांनी महानगरपालिकेच्या वाहनतळ परिसरात सादर केले. उपस्थीत विद्यार्थी, नागरीक यांना शुद्ध हवेसाठी पुरक अश्या वृक्षांच्या बियांचे वाटप करण्यात आले तसेच सर्वांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली. पर्यावरणपुरक वाहने वापरण्याचा संदेश देत मनपाचे उपअभियंता विजय बोरीकर यांच्या हस्ते रॅलीस हिरवी झेंडी दाखविण्यात आली. अधिकारी, कर्मचारी तसेच शाळकरी मुलांनी सायकल रॅलीत सहभाग घेतला. गांधी चौक ते आझाद बगीचा ते गांधी चौक असे मार्गक्रमण करत महानगरपालिकेच्या वाहनतळ परिसरात रॅलीची सांगता झाली.

फुफ्फुसाच्या कर्करोगाला कारणीभूत ठरणारी प्रदूषित हवा पर्यावरणाचीही कायमस्वरुपी हानी करत असल्याने त्याकडे अधिक दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरेल. हवा प्रदूषणाचे धोके ओळखुन पर्यावरणपुरक वाहनांचा वापर करणे, वृक्षलागवड करणे,कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करणे, नूतनीकरण योग्य ऊर्जेचा वापर करणे इत्यादी गोष्टी प्रकर्षाने करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.