मोझॅक विषाणूजन्य रोगांपासून सोयाबीन पिकाचे संरक्षण करावे

मोझॅक विषाणूजन्य रोगांपासून सोयाबीन पिकाचे संरक्षण करावे

भंडारा, दि. 2 : सोयाबीन पिकावरील मोझॅक व्हायरस नावाच्या विषाणूमुळे होत असून पिवळा मोझॅक मुगबिन येलो मोझॅक या विषाणूमुळे होतो. रोगाचा प्रसार प्रामुख्याने मावा किडीद्वारे, बियाणेद्वारे तसेच पिवळा मोझॅक पांढरी माशी या किटकाद्वारे होतो.

मोझॅक रोगग्रस्त झाडांच्या पानांच्या शिरा पिवळ्या पडतात तसेच फिक्कट हिरवे व पिवळसर हिरवे रंगाचे पट्टे पानांवर दिसून येतात. झाडांची पाने गुंडाळली जातात. पानांवरील पेशी नष्ट होतात व झाड वाळते. त्यानंतर रोगग्रस्त झाडापासून तयार होणारे बियाणे आकाराने लहान व सुरकतलेले असते व त्याची उगवण क्षमता कमी होते. साधारणपणे 30 से.पेक्षा जास्त तापमान या रोगास पोषक असून या हवामानास रोगांची लक्षणे ठळकपणे दिसून येतात.

मोझॅक रोगाचा प्रसार रोखण्याकरीता विषाणूरहित चांगल्या प्रतीचे बियाणे पेरणीसाठी वापरावे, रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत, रोग प्रभावित क्षेत्रातील सोयाबीन बियाण्यासाठी वापरू नये, रोगाचा प्रसार प्रामुख्याने मावा या किडीद्वारे होत असल्याणे मोनोक्रोटोफॉस या कीटकनाशकाची 15 मिली, 10 लि. पाण्यात किंवा इमिडाक्लोप्रीड 17.8 टक्के एस.एल.या कीटक नाशकाची 4 मिली प्रती 10 लि पाण्यत मिसळून फवारणी करावी.

पिवळा मोझॅक रोगग्रस्त झाडांच्या पानांचा काही भाग हिरवट तर काही पिवळसर दिसून येतो. शेंड्याकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात. बाधित झाडाची वाढ पूर्णपणे खुंटते. पाने सुरकतून जातात फुलांची व शेंगांची संख्या देखील कमी होते. सोयाबीनच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो. या रोगाचा प्रसार पांढरी माशी या किटकाद्वारे होतो.

पिवळा मोझॅक रोगाचा प्रसार रोखण्याकरीता रोगाची लक्षणे दिसताच शेतातील रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत, सोयाबीन पिकात आंतरपिक व मिश्र पिक घेतल्यास रोगाचे प्रमाण कमी आढळते, पिवळे चिकट सापळे सोयाबीन पिकात हेक्टरी 10 ते 12 या प्रमाणे लावावेत. आंतरप्रवाही कीटक नाशकाचा वापर करावा. डायमिथोएट 30 टक्के प्रवाही 10 मिली. किंवा मिथिल डेमेटॉन 25 टक्के प्रवाही 10 मिली 10 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी ,असे आवाहन तांत्रिक माहिती व सहकार्य म.फु.कृ.वि.राहुरी यांनी केले आहे.