राष्ट्रीय क्रीडा दिनाचे भव्य आयोजन रॅलीचे आयोजन

राष्ट्रीय क्रीडा दिनाचे भव्य आयोजन रॅलीचे आयोजन

भंडारा, दि. 29 : आज राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन क्रिडा संकुलात मोठ्या उत्साहात करण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, तथा नेहरु युवा केंद्र शिक्षण विभाग व जिल्हयातील विविध क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज स्व. मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणातून जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांनी स्व.मेजर ध्यानचंद यांच्या जिवनावर प्रकाश टाकला. तसेच ऑलिम्पीक सुवर्ण कालखंडाचे शिल्पकार स्व. मेजर ध्यानचंद यांच्या कार्याचा गौरव व्हावा व उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी म्हणून केंद्र शासन व राज्य शासन त्यांच्या जन्म दिनी 29 ऑगष्ट्र राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.

जिल्हा समन्वयक नेहरु युवा केंद्र, हितेंद्र वैद्य यांनी शारीरिक तंदुरुस्ती शिवाय जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात उज्वल कामगीरी बजावू शकता येणार नाही असे प्रतिपादन केले. त्यासाठी बळकट शरीरात, बळकट मन या उक्तीप्रमाणे तंदुरुस्ती आणि क्रीडा यांचे जिवनात अपार महत्व असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजेंद्र भांडारकर, सुनिल कुरंजेकर, श्याम देशमुख, बेनिलाल चौधरी, प्रशांत घाटबांधे, सुनिल खिलोटे, सुनिल पंचबुधे राजेश गेडाम, विनय मानापूरे सौरभ तोमर, विवेक उजवणे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी स्व. मेजर ध्यानचंद यांचे जिवनावर खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले. व खेळाचे महत्व पटवून दिले. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त् गांधी चौक येथे हितेंद्र वैद्य व राजेंद्र भांडारकर, यांच्या हस्ते गांधी पुतळयाला माल्यार्पण करुन क्रीडा रॅलीला हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात आले. यावेळी क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. क्रीडा रॅलीमध्ये भंडारा जिल्हयातील अनेक शाळा क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा शिक्षक, क्रीडा कार्यकर्ता, नागरीक व समस्त क्रीडाप्रेमी सहभागी झाले होते.

क्रीडा रॅली जिल्हा क्रीडा संकुल, येथे आल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्व.मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. क्रीडा रॅलीमध्ये भंडारा जिल्हयातील अनेक शाळा क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा शिक्षक, क्रीडा कार्यकर्ता, नागरीक व समस्त क्रीडा प्रेमी सहभागी झाले होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगेश गुडधे, राज्य क्रीडा मार्गदर्शक, भोजराज चौधरी, राज्य क्रीडा मार्गदर्शक रविंद्र वाळके , सुरज लेंडे, रामभाऊ धुडसे, अतुल गजभिये, विनोद मडामे, औसत पाल, यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे संचालन भोजराज चौधरी, राज्य क्रीडा मार्गदर्शक व आभार मंगेश गुडधे, राज्य क्रीडा मार्गदर्शक यांनी मानले.