मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांनी साधला स्वयंसेवी संस्थांशी संवाद

मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांनी साधला स्वयंसेवी संस्थांशी संवाद

चंद्रपूर, ता. २ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यात लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने जनजागृती व्हावी यासाठी मनपाचे अतिरिक्त आयुक्त विपीन पालिवाल यांनी गुरुवारी (ता. २) शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

चंद्रपूर शहरात गणेशोत्सवाची तयारी सुरु आहे. त्यासाठी मनपाने देखील पूर्वतयारी सुरु केली आहे. मूर्ती आगमनापासून विसर्जनापर्यंत विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. त्यात पर्यावरणपूरक उत्सव साजरा व्हावा, यासाठी स्वयंसेवी संस्थांचा सहभाग द्यावा, असे आवाहन मनपाचे अतिरिक्त आयुक्त विपीन पालिवाल यांनी केले. तसेच स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींकडून मार्गदर्शक सूचना आणि पर्यावरणपूरक नवीन उपक्रमांची माहिती जाणून घेतली. प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या मूर्तीवर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. विक्री, आयात आणि निर्मिती होताना आढळल्यास त्यावर आळा घालण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. याशिवाय रेनवॉटर हॉर्वेस्टिंग, सायकल चालविणे, सौरऊर्जेचा वापर, कंपोस्ट खत निर्मिती, माझे घर माझी बाग आदी उपक्रमांना चालना देण्यास तसेच यामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, यासाठी शासकीय तसेच सामाजिक स्तरावर प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे मत अतिरिक्त आयुक्तांनी व्यक्त केले. बैठकीला स्वच्छता विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल शेळके, ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे, प्रा. योगेश दुधपचारे, इको-प्रोचे नितिन रामटेके, राजू काहीलकर, अमोल उट्टलवार, अजय बहुद्देशीय संस्थेच्या स्वाती धोटकर, महेश शेंडे, कुंभार समाज विकास संस्थेचे अजय मार्कडेयवार, राजेश रामगुंडेवार, चंद्रपूर जिल्हा कुंभार समाज बहुद्देशीय संस्थेचे सुभाष तटकंटीवार यांच्यासह रक्षण धरणीमातेचे, जगूया माणुसकीने यांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.