भंडारा : कर्जमुक्तीसाठी आधार बँक खात्यास लिंक करा शेतकऱ्यांसाठी 5 सप्टेंबरपर्यंत मुदत- जिल्हा उपनिबंधक

भंडारा : कर्जमुक्तीसाठी आधार बँक खात्यास लिंक करा शेतकऱ्यांसाठी 5 सप्टेंबरपर्यंत मुदत- जिल्हा उपनिबंधक

भंडारा, दि. 29 : महात्मा जोतीराव फुले शेतकरी सन्मान योजना अंतर्गत पिक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यामध्ये वर्ग होणार असून त्यासाठी वापरात असलेले बँक खाते 5 सप्टेंबर पुर्वी आधार कार्डशी लिंक केलेले असणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे आधारकार्ड, बचत खाते नाही त्यांनी तातडीने काढून ते आधारलिंक करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था एस.पी.कांबळे यांनी केले आहे.

या योजनेकरीता पात्र असणाऱ्या ज्या शेतकऱ्यांचे आधार क्रमांक उपलब्ध नाहीत. अशा शेतकरी सभासदांची यादी गटसचिव व सबंधित तालुक्यांच्या बँक अधिकारी यांनी तयार करून ती संस्थेचे कार्यालय, ग्रामपंचायत, बँक शाखेच्या ठिकाणी प्रसिध्द करावी. आधार कार्ड नसलेल्या शेतकऱ्यांस तात्काळ आधार क्रमांक काढण्यास सांगावे व मोबाईल क्रमांक आधारकार्डशी लिंक करण्यांस सर्व शेतकऱ्यांना कळवावे .

शेतकरी सभासदाचे नाव, जन्मतारीख, बचत खाते क्रमांक तसेच आधार क्रमांक अचूक असल्याची माहिती भरताना खात्री करण्यांत यावी. मृत खातेदारांची माहिती भरावयाची नाही. संयुक्त व मृत वारस कर्जखात्यांच्या बाबतीत प्रत्येक कर्जदाराचा कर्जामधील हिस्सा विवरणपत्रामध्ये नमूद केला असल्याची खात्री करावी. मृत खातेदाराच्या कर्जखात्यांस वारसाची नोंद करून वारसाची माहिती भरावी. वारस योजनेसाठी अपात्र नसावा. तसेच त्याला शेतकरी कर्जमुक्ती योजना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नसावा अथवा त्याचे याच योजनेसाठी दुसरे पात्र खाते नसावे असे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था एस.पी.कांबळे यांनी कळविले आहे.