20 ऑगस्ट रोजी नाविन्यता यात्रा भंडाऱ्यात महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेत युवक -युवतींनी नोंदणी करावी  – सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास

20 ऑगस्ट रोजी नाविन्यता यात्रा भंडाऱ्यात महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेत युवक -युवतींनी नोंदणी करावी  – सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास

भंडारा, दि. 18 : राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत “महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण” जाहीर करण्यात आले आहे. धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी ही नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे. या धोरणाच्या माध्यमातून राज्यामधे स्टार्टअपच्या विकासाकरिता पोषक वातावरणनिर्मिती करून त्यातून यशस्वी उद्योजक घडविण्याकरिता इनक्युबेटर्सची स्थापना व विस्तार, गुणवत्ता परीक्षण व स्टार्टअप्सना बौद्धिक मालमत्ता हक्कासाठी अर्थसहाय्य, ग्रैंड चॅलेंज, स्टार्टअप वीक यांसारख्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. भंडारा जिल्हयात ही यात्रा 20 ऑगस्ट रोजी येणार आहे.

महाराष्ट्राच्या तळागाळातील नवउद्योजकांचा आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेवून त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, नवसंकल्पनांना तसेच सुरुवातीच्या टप्प्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरवणे, राज्यातील उद्योजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करणे, राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाद्वारे महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. यात्रेचे 3 टप्पे – 1. तालुकस्तरीय प्रचार व प्रबोधन (यात्रेबाबतची संपूर्ण माहिती, नावीन्यपूर्ण संकल्पना, त्याचे इतर पैलू याबाबतची माहिती देण्यात येणार. नावीन्यपूर्ण कल्पना असलेले नागरिक आपल्या कल्पना यावेळी नोंदवू शकतात. 2. जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण स्पर्धा प्रशिक्षण शिबिरात नवउद्योजकतेबाबतचे माहिती सत्र, स्थानिक उद्योजक व तज्ज्ञ मार्गदर्शक यांची व्याख्याने होणार आहेत. तसेच नोंदणी केलेल्या नवउद्योजकांच्या संकल्पनांची सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर सर्वोत्तम कल्पना सादर करणार्यांना प्रथम पारितोषीक 25 हजार, द्वितीय पारितोषीक 15 हजार व तृतीय परितोषीक 10 हजार मिळणार आहे. 3. राज्यस्तरीय सादरीकरण स्पर्धा व विजेत्यांची घोषणा प्रत्येक सादरीकरण सत्रातील उत्तम 10 कल्पनांचे राज्यस्तरीय सादरीकरण तज्ज्ञ समितीसमोर करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय विजेत्यांना 1 लाख रुपयांपर्यंतचे रोख अनुदान तसेच आवश्यक पाठबळही पुरविण्यात येतील.

यात्रेचा शुभारंभ 15 ऑगस्टपासून झाला असून अधिक माहितीसाठी व सहभाग नोंदविण्यासाठी www.msins.in किंवा www.mahastartupyatra.in वर भेट देवून जिल्हायातील जातीत जास्त युवक/युवतींनी नोंदणी करावी असे आवाहन श्री. सुधाकर झळके, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांनी केले आहे.