वृक्षारोपण हे ईश्वरीय कार्य – मंत्री सुधीर मुनगंटीवार

वृक्षारोपण हे ईश्वरीय कार्य – मंत्री सुधीर मुनगंटीवार

Ø यशस्वितेसाठी लोकसहभाग महत्वाचा

Ø आयएमए च्या वुमेन्स विंग तर्फे वृक्षारोपण संपन्न

चंद्रपूर, दि. 14 : कोणतेही सामाजिक कार्य व आंदोलन जनतेच्या सहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. सामाजिक संघटना तसेच सर्वसामान्य जनतेचा सहभाग अतिशय गरजेचा आहे. वृक्षारोपणासाठी आयएमए च्या वुमेन्स विंगने घेतलेला पुढाकार अभिनंदनीय आहे. मी वनमंत्री असताना राज्यात विक्रमी वृक्षारोपण करण्यात आले. ही मोहीम लोक सहभागामुळेच यशस्वी होऊ शकली, असे प्रतिपादन राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

शनिवारी आयएमएच्या वुमेन्स विंगच्या माध्यमातून आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, प्राणवायुसाठी वड, पिंपळ, औदुम्बर, बेल, आंबा, कडुनींब आदी वृक्ष लावणे आवश्यक आहे. अनेक झाडांना पौराणिक महत्व आहे. आज मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड़ होत असल्याने पर्यावरणाचा -हास होत आहे. अशावेळी पर्यावरणाचे रक्षण करण्याची जवाबदारी आपली आहे. ‘चाहते हो यदी जीवन बचाना, मत भूलो फिर वृक्ष लगाना’ ही कवितेची ओळ म्हणत श्री. मुनगंटीवार म्हणाले, या जिल्ह्यात मी अनेक वन उद्यान, बगीचे निर्माण केले मात्र जॉगर्स पार्कमध्ये आल्याचा आनंद आज होतोय. वृक्षारोपण हे ईश्वरीय कार्य आहे. हे कार्य अविरत सुरू ठेवावे. आयएमए पदाधिका-यांनी वनविभागाच्या प्रमुखांसह मिटिंग घेऊन यात आणखी काय सुधारणा करता येईल ते सांगावे. मी निश्चितपणे योग्य प्रयत्न करेन, असेही श्री मुनगंटीवार म्हणाले.

यावेळी महानगरपालिकेचे आयुक्‍त राजेश मोहीते, आय.एम.चे. अध्‍यक्ष डॉ. अमोल पोद्दार, सचिव नगिना नायडू, महिला अध्‍यक्षा डॉ. कल्‍याणी दीक्षित, मुख्य वनसंरक्षक प्रवीण लोणकर, विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभुषण पाझारे, सुभाष कासनगोट्टूवार, रवी गुरनुले, प्रकाश धारणे, विठ्ठलराव डुकरे, रवी लोणकर, उमेश आष्‍टनकर, आय.एम.ए. चे सर्व पदाधिकारी व डॉक्‍टर्स, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, तसेच नागरिक उपस्थित होते.